Untitled 1

योग्यांचे दहा यम

अहिंसा सत्यमस्तेयं ब्रह्मचर्यं क्षमा धृतिः।
दयार्जवं मिताहारः शौचं चैव यमा दश॥

अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृति, दया, आर्जव, मिताहार, शौच हे दहा यम आहेत.

स्वात्मारामाने आता दहा यम कोणते सांगितले आहेत. सर्वच संस्कृतींमधे, देशांमधे अहिंसा, सत्य यांसारख्या गुणांना महत्वाचे स्थान आहे. योग्याच्या जीवनात तर ते काकणभर जास्तच महत्वाचे आहेत. साधारणतः असे दिसून येते की समाजातील अनेक जण अहिंसा, अस्तेय यांसारख्या तत्वांचे पालन करत असले तरी ते पालन मनापासून असतेच असे नाही. लहान मुलांना त्यांचे आईबाप काय सांगितात? दुसर्‍यांशी मारामारी करू नको. का? तर शिक्षक रागावतील म्हणून. चोरी करू नये. का? तर पोलीस पकडतील म्हणून. म्हणजे अप्रत्यक्षपणे शिक्षकांना समजणार नाही अशा प्रकारे मारामारी करा किंवा पकडले न जाण्याची हुशारी दाखवून चोरी करा असेच त्या व्यक्तीच्या मनावर ठसते. मग तो मुलगा मोठा झाल्यावर या गोष्टींचे पालन तर करतो पण जोरजबरदस्तीने. मनापासून नव्हे.

योग्याला मात्र असे करून चालत नाही. नुसत्या दिखाव्याने जगाला फसवता येईल पण स्वतःला कसे फसवणार? योगी या गुणांचा अवलंब करतो तो मनाचा पोत सुधारावा म्हणून. संस्कारक्षय करण्यात मदत व्हावी म्हणून. हे कसे साधते ते नंतर पाहणारच आहोत पण येथे सांगायची गोष्ट ही की योगी खर्‍या अर्थाने हे गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करत असतो. असो.

अहिंसा

अहिंसा म्हणजे अकारण हिंसा न करणे. खरे सांगायचे तर प्रतिक्षण आपण हिंसा करतच असतो. आपल्या शरीराची निसर्गातः रचनाच अशी आहे की श्वास घेताना, अन्न पचवताना, रोगांचा प्रतिकार करताना आपोआप हिंसा होताच असते. अगदी चालताना, बसताना आपल्या शरीराच्या वजनाने देखील असंख्य जीवजंतू मरत असतात. उच्चतम कोटीच्या सत्पुरूषांना देखील ती टाळता येत नाही. ती तशी टाळता येणारही नाही कारण मनुष्यदेह निसर्गनियमांनी बांधला गेला आहे. तेव्हा अहिंसेविषयी अवास्तव कल्पना सुरवातीला साधकाने बाळगू नयेत. ज्ञानेश्वरीमध्ये अहिंसेच्या नावाखाली हिंसाचा कशी चालते ते फार छान प्रकारे सांगितले आहे. सुरवातीला तरी अवाजवी आणि अकारण हिंसा टाळणे एवढेच ध्येय ठेवावे. याविषयी एक छान गोष्ट आहे.

एकदा एक ऋषी जंगलातून जात होते. वाटेत त्यांना एका साप भेटला. सापाने त्यांना नमस्कार केला आणि उपदेश देण्याविषयी विनंती केली. ते म्हणाले, "तु दुसर्‍याना दंश करणे सोडून अहिंसेने जीवन जग."  ऋषी आपल्या वाटेने निघून गेले. इकडे सापाने आपले अहिंसा व्रत सुरू केले. गावातील काही मुले खेळता खेळता जंगलात आली. त्यांनी त्या सापाला पाहिले. प्रथमा ती घाबरली पण मग त्यांच्या लक्षात आले की साप काहीच करत नाहीये. मागं त्यांना चेव चढला. दगड, काठ्या यांच्या सहायाने त्यांनी त्या सापाला डिवचायला सुरवात केली. साप बिचारा त्या ऋषीच्या सल्य्यानुसार अहिंसेचे पाळन करत होता. बर्‍याच वेळाने कंटाळून मुले निघून गेली. संध्याकाळी ऋषी परत त्या वाटेने परतत होते. त्यांनी सापाला धुळीत वेदनेने कळवळताना पाहिले. त्यांनी सापाची विचारपूस केली. सर्व प्रकारा एकल्यावरा ते म्हणाले, "अरे! मी तुला दंश करू नको असे सांगितले होते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या मुलांवर केवळ फुत्कार टाकले असतेस तर तुझी अशी दशा झाली नसती."

तर सांगायची गोष्ट अशी की सुरवातीलातरी साधकांनी यम-नियमांचा अतिरेक टाळून समतोल साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आता अकारण हिंसा का टाळायची? त्याचे सूक्ष्म आध्यात्मिक कारण यथावकाश पाहूच पण अगदी शरीर-मनाच्या द्रुष्टीने विचार करताही ते सहज कळेल. राग आला की आपला श्वाशोच्छ्वास जोराने होऊ लागतो, रक्तदाब वाढतो, अंतर्गत संस्था, हार्मोन्सवर परिणाम होतो. मनाचा स्थिर भाव पार नाहीसा होतो. त्यामुळे हिंसा ध्यानासाठी पोषक नाही हे उघडच आहे.

सत्य

स्वात्माराम दूसरा यम सांगत आहे तो म्हणजे सत्य अर्थात खोटे न बोलणे. 'जे घडले ते सांगितले' असे वर्तन म्हणजे सत्य. असत्य वर्तनामागे अनेकदा स्वार्थ असतो. सरळ मार्गाने हवी असलेली गोष्ट मिळाली नाही की असत्याची कास धारून ती मिळवायची अशी वृत्ती बनते. म्हणजे परत मनाचा सात्विक भाव नासतो. सत्य हा वाटायला सोपा यम वाटला तरी आचरणात आणायला फार काठीण आहे. व्यवहारात अगदी छोट्या छोट्या गोष्टीत खोटं बोलण्याची सवय असलेली माणसं आपल्या आजूबाजूला अगदी सहज सापडतात. प्राचीन ऋषींच्या अंगी सत्य बाणलेले असल्याने ते जे बोलत (आशिर्वाद अथवा शाप) ते सत्य ठरत असे.

अस्तेय

अस्तेय म्हणजे चोरी न करणे किंवा जे आपले नाही ते न स्वीकारणे. सामान्यतः सर्वच जण असे सांगतील की ते अस्तेयाचे पालन करत आहेत. जर अशांना जंगलात हिंडत असता खजिना सापडला तर त्यातील किती त्याला हातही न लावता परत येतील हा विचार करण्याचा मुद्दा आहे. स्वार्थ फार खोलवर रुजलेला असतो. दैनंदीन जीवनात स्वार्थाला पदोपदी खतपाणी घातले जाते. कार्यालयात दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय स्वतः लाटण्यापासून ते अगदी घरच्या संगणकावर पायरेटेड सॉफ्टवेअर वापरण्यापर्यंत सर्वच गोष्टीत अस्तेयाचे सर्रास उल्लंघन केले जाते. 

ब्रह्मचर्य

अध्यात्म जगतामधे ब्रह्मचर्य ही चावून चावून चोथा झालेली गोष्ट आहे. एवढ्या जणांनी त्याबद्दल आपापल्या मतानुसार भाष्य केले आहे की नवीन साधकाचा खरे काय अन खोटे काय याबद्दल गोंधळ उडतो. ब्रह्मचर्य हे एक थोतांड आहे इथपासून ते पराकोटीच्या ब्रह्मचर्याला पर्याय नाही इथपर्यंत मतप्रवाह आढळतात. तेव्हा त्या वादात फारसा न शिरता मी येथे अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यांवर सहसा प्रकाश टाकला जात नाही.

मुळात ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्माचे आचरण करणे. ब्रह्म म्हणजे प्रसरण (to expand) पावलेले. ही सारी सृष्टी ब्रह्मतत्वाचा विस्तारमात्र आहे. Energy can neither be created nor be destroyed; it can be only converted from one form to another या शास्त्रीय नियमानुसार एक ब्रह्मतत्वच नाना रूपांनी या विश्वात ठासून भरले आहे. 'सर्वम खलिद्वम ब्रह्म' हा अध्यात्म-सिद्धांत सुपरीचीतच आहे. या मूळ ब्रह्मतत्वाचे आचरण वा पाठपुरावा करणे म्हणजे ब्रह्मचर्य. आता नवीन साधकाच्या दृष्टीने गोंधळात टाकणारा भाग असा की सर्वसाधारणपणे ब्रह्मचर्य म्हणजे वीर्यस्खलन होऊ न देणे असा अर्थ सांगितला जातो पण ब्रह्मचर्य शब्दाच्या मूळ अर्थाशी त्याचा ताळमेळ बसलेला मात्र त्याला दिसत नाही.

ब्रह्मचर्याचे खरे रहस्य काही वेगळेच आहे. हे रहस्य जाणून घेण्याकरता बिंदू ही योगशास्त्रीय संकल्पना माहीत असली पाहिजे. योगशास्त्रानुसार मेंदूतील सहस्रार चक्रातून बिंदू नामक एक सूक्ष्म स्त्राव पाझरत असतो. खाल्लेल्या अन्नातील सर्वोत्कृष्ट घटकापासून हा बिंदू तयार होत असतो. बिंदू सर्व शरीराचे पोषण करतो. बिंदूपासूनच वीर्याची निर्मीती होत असते. जर वीर्यस्खलन झाले तर पर्यायाने बिंदू नाश पावतो. शरीरही "मागणी तेवढा पुरवठा" हे तत्व पाळत असते. जेवढा विषयसुखाचा अतिरेक अधिक तेवढे वीर्य आणि संलग्न हार्मोन्सचे उत्पादन अधिक होते. परिणामी बिंदू अधिकाधीक प्रमाणात ह्रास पावतो. तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकांनी भारतीय खेळाडूंना "अधिक विषयसूख घ्या" असा सल्ला दिला होता. त्यावरून अनेक उलट सुलट मतेही एकायला मिळाली होती. या सल्ल्यामागचे वैद्यकीय कारण काय होते? जास्त विषयोपभोग घेतल्याने "मागणी तेवढा पुरवठा" या तत्वानुसार पुरुषांच्या शरीरातील पुरूष हार्मोन्सचे (testosterone) प्रमाण वाढते. या हार्मोन्समुळे आक्रमकता, दणकटपणा, स्टॅमिना असे गुणधर्म वाढतात परिणामी खेळाडूंची क्षमता वाढेल असा त्या सल्ल्यामागचा उद्देश होता. असो. तर सांगायचा भाग असा की अधिक विषयसुखाने वीर्योत्पादनात वाढ आणि बिंदूत घट होते.

बिंदूसंवर्धनाचा योगशास्त्राच्या द्रुष्टीने काय फायदा आहे बरे? तुम्हाला कदाचित माहीत असेल की आधुनिक विज्ञान असे सांगते की प्रत्येक व्यक्तीमध्ये मग ती पुरूष असो वा स्त्री, पुरूष आणि स्त्री असे दोनही प्रकारचे हार्मोन्स असतात. जरा व्यक्ती पुरूष असेल तर पुरूष हार्मोन्सचे प्रमाण स्त्री हार्मोन्सपेक्षा जास्त असते आणि जर स्त्री असेल तर स्त्री हार्मोन्सचे प्रमाण पुरूष हार्मोन्सपेक्षा जास्त असते. जेव्हा साधक ब्रह्मचर्याचे पालन करू लागतो तेव्हा वीर्योत्पादन आणि संलग्न हार्मोन्सचे उत्पादन अतिशय कमी प्रमाणात होऊ लागते. स्त्री-पुरूष हार्मोन्सचे बाह्य मीलन थांबते आणि शरीरांतर्गत स्त्री-पुरूष तत्वांचे मीलन सुरू होते. योगशास्त्रात या स्त्री-पुरूष तत्वांना अनुक्रमे रज आणि शुक्ल असे म्हणतात. रज आणि शुक्ल यांचे अंतर्गत मीलन सुरू झाले की बाह्य मीलनापेक्षा अनेक पटींनी अधिक आनंद साधकाला प्राप्त होतो. योगशास्त्रानुसार रज मूलाधारात असते तर शुक्ल सहस्रारात असते. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले तर मूलाधारातील कुंडलिनी (स्त्री) सहस्त्रातील शिवाकडे किंवा ब्रह्मतत्वाकडे (पुरूष) आकर्षित होते आणि ही मिलनोत्सुक शक्ती ब्रह्मरंध्रातून वर वर सरकू लागते. ब्रह्मरंध्र या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मतत्वाचे सूक्ष्म विवर किंवा Brahma's canal or duct. हे विवर सुषुम्नेतील चित्रा नामक नाडीत असते. या विवारातून शक्ती सहस्रारात पोहोचली की शिव-शक्ती मिलन घडून येते. साधक सत-चित-आनंद अशा ब्रह्मतत्वाचा अनुभव घेतो. आता तुम्हाला ब्रह्मचर्य या शब्दाचा मूळ अर्थ, ब्रह्मतत्वाचे आचरण आणि वीर्यरक्षण यांतील संबंध लक्षात येईल. योगशास्त्रीय परिभाषेतील या गोष्टी आधुनिक विज्ञानाला आज पूर्णपणे ठावूक नाहीत पण आपण आशा करू की भविष्यात आधुनिक विज्ञानालाही त्यांचे स्पष्टीकरण आपल्या स्वतःच्या परिभाषेत करता येईल.

तर ब्रह्मचर्याचे महत्व हे असे आहे. ब्रह्मचर्याची विभागणी खालील तीन प्रकारात करता येईल :

  • गृहस्थी साधकाचे ब्रह्मचर्य
  • वैराग्यशील साधकाचे ब्रह्मचर्य
  • तांत्रिक साधकाचे ब्रह्मचर्य

प्राचीन काळचे ऋषी पहिल्या वर्गात मोडत असत. गृहस्थी पुत्रपौत्रांसहीत जीवन जगूनसुद्धा त्यात संयम पाळून, विषयसुखाचा अतिरेक न करता त्यांनी बिंदूरक्षण साधले होते. वैराग्याशील माणूस (योगी, बैरागी, संन्यासी, अवधूत वगैरे) संसाराच्या भानगडीत न पडता वैराग्याचे काटेकोर अनुशीलन करून बिंदूरक्षण साधतो. तांत्रिक साधक वज्रोली मुद्रेच्या सहाय्याने भोग घेऊन सुद्धा बिंदूरक्षण करतो. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल किंवा तुमचा विश्वास बसणार नाही पण या तीन प्रकारात दूसर्‍या प्रकाराने ब्रह्मचर्य साधणे खूप सोपे आणि निर्धोक आहे. पहिल्या आणि तीसर्‍या प्रकारात प्रलोभने फार असतात. केवळ साधकाचाच नव्हे तर त्याच्या जोडीदाराचाही स्वतःवर ताबा असावा लागतो. साधक अध्यात्म मार्गाकडे कल असलेला पण त्याचा जोडीदार मात्र भौतिक सुखाची हाव असलेला असा प्रकार असेल तर मग ब्रह्मचर्य पाळणे साधकाला कठीण जाते.

क्षमा

दुसर्‍याच्या चुकीबद्दल त्याला दंड न देता उदारमनाने त्याला माफ करणे म्हणजे क्षमा. जेव्हा दुसर्‍याकडून आपल्याविषयी काही चूक घडते तेव्हा सामान्यपणे मनात राग उफाळून येतो. लोकल ट्रेन मध्ये सहप्रवाश्याचा जरासा धक्का लागला तरी त्याला मारहाण करणारी माणसं आपण अनेकदा बघतो. हा राग येण्याचे सूक्ष्म कारण त्या व्यक्तीच्या अहंकाराला लागलेली ठेच हे असते. क्षमाशील साधक मनाचा तोल ढळू न देता, आपल्या व्यक्तीगत अहंकाराला खतपाणी न घालता उदार मनाने अपराध्याला माफी देतो. अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे येथेही तारतम्य बाळगले पाहिजे. समाजजीवनाच्या द्रुष्टीने हानीकारक गोष्टींना लोकाचरणार्थ अवश्य कायद्यानुसार शासन दिले पाहिजे.

धृति

धृति म्हणजे धैर्य. योगमार्गावर धैर्य अत्यावश्यक आहे. योगमार्ग तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखा आहे. साधकाला त्यावर पदोपदी अडचणींना तोंड द्यावे लागते. एक तर योग साधक आजूबाजूच्या दहा संसारी माणसांपेक्षा वेगळा मार्ग चोखाळत असतो. त्यात परत योगमार्गातली विघ्ने असतातच. योगमार्गावरील प्रगती कधी सरळ चढया दिशेने होत नाही. अनेकदा सुरवातीला प्रगती होते, काही अनुभव येतात, साधक आनंदात असतो. मग अचानक ही लक्षणे जणू गुडूप होतात. साधना नीरस वाटू लागते. हा फार महत्वाचा टप्पा असतो जो अनेक वर्षेसुद्धा चालू शकतो. या काळात शंकाकुशंकांनी साधक सैरभैर होतो. आपले काय चुकले, आता काय करावे हे त्याला काळेनासे होते. काही वेळा कुंडलिनी जागरणाची लक्षणे एवढी तीव्र असतात की साधक भांबावून जातो. आपल्याला काही अपाय तर होणारा नाही ना अशी काळजी त्याला वाटू लागते. अशा वेळी केवळ धैर्यशील साधकच टिकाव धरू शकतो.

दया

दया म्हणजे गरजू व्यक्तीवर प्रेमाने उपकार करणे किंवा त्याला मदत करणे. दया साधकाला सात्विक बनवते. काही वेळा साधक अशी तक्रार करतात की सर्वांवर प्रेम करा, सर्व जीवांत परमेश्वर वास करतो वगैरे आध्यात्मिक तत्वे आम्हाला कळत नाहीत. अशी तत्वे पुस्तकात वाचणे ही एक गोष्ट आहे आणि त्यांची प्रत्यक्ष अनुभूती ही दुसरी गोष्ट आहे. दया साधकाला दुसर्‍याच्या दुःखात सहभागी होवून मदतीचा हात पुढे करायला शिकवते. ब्रह्मानुभूतीला आवश्यक असलेली मानसिक बैठक तयार व्ह्यायला त्यामुळे मदत होते. आजच्या काळात दया ही सुद्धा स्वार्थापोटी केली जाते. माणसं NGO ला देणग्या देतात. का तर टॅक्स मधे सूट मिळेल म्हणून किंवा आपले नाव चार ठिकाणी छापून येईल म्हणून. ही रजोगुणी दया झाली. अशी दया अध्यात्मामार्गावर फारशी उपयोगी पडणार नाही.

आर्जव

आर्जव म्हणजे स्वभावातील सरळपणा. स्वतःबद्दल अहंकार न बाळगता नम्र वर्तन करणे. स्वभावात सरळपणा नसेल तर त्याच्या अनुषंगाने अहंकार, कपट, स्वार्थ, अप्पलपोटेपणा असे दुर्गूण बळावतात. एक खोटी गोष्ट लपवायला दहा खोट्या गोष्टी कराव्या लागतात. सरळपणे वागणार्‍या माणसाला असा खोटेपणा कधी करावा लागत नाही. 

मिताहार

हा फार महत्वाचा विषय आहे. मिताहार म्हणजे मोजकाच सात्विक आहार ग्रहण करणे. अति आणि अयोग्य आहारमुळे पचंनसंस्थेवर फार ताण पडतो. जी ऊर्जा योगसाधनेत वा अन्य चांगल्या कार्यात खर्ची पडायला पाहिजे ती अन्न पचवण्यात वाया जाते. झोप आणि सुस्ती येते परिणामी ध्यान नीट लागत नाही. शरीर जर खाल्लेले अन्न पचवू शकले नाही तर दूषित द्रव्ये (ज्याला आयुर्वेदात आम म्हणतात) शरीरातील पोकळ्यात, सांध्यात, विवेध शरीरसंस्थांत साठतात. ही द्रव्ये प्रमाणाबाहेरा साठली की रोगांच्या रूपाने बाहेर टाकली जातात. आयुर्वेदानुसार पोटाचे चार भाग कल्पून दोन अन्नाने आणि एक द्रवाने भरावा. उरलेला भाग वातासाठी मोकळा ठेवावा. सात्विक अन्न पचायला हलके पण आवश्यक पोषण देणारे असते. मसालेदार, अति तेलकट, तिखट, मिष्टान्न, वनस्पती तुपाटा तळलेले पदार्थ टाळणेच योग्य ठरेल. त्याचबरोबर कांदा, लसूण, मद्य, मांस इत्यादी पदार्थही टाळले पाहिजेत. योगासास्त्रानुसार हे तामसी पदार्थ आहेत . आयुर्वेदानुसार कांदा वीर्यवर्धक आणि निद्रा प्रदान करणारा पदार्थ आहे. एकीकडे ब्रह्मचर्य पाळायचे आणि दुसरीकडे वीर्यवर्धक पदार्थ खायचे हे एकमेकांच्या विरूद्ध ठरेल. आयुर्वेदानुसार लसूण तीक्ष्ण आणि जंतुघ्न आहे. कांदा आणि लसूण वासाच्या दृष्टीनेही चांगले नाहीत. मांसाहारी पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिका असते. प्रथिने पचवायला पचंनसंस्थेला अधिक वेळ आणि ताकद लागते. परत मांसाहारी भोजन साधारणतः मसालेदार, तिखट आणि तेलकट असते. याकरता वरील पदार्थ होता होईल तो टाळले पाहिजेत. भाज्या, गहू, तांदूळ, मूग डाळ, मोड आलेली कडधान्ये, ताजी फळे, सुका मेवा, ताक, गाईचे दूध, घरगुती साजुक तूप हे पदार्थ योग्याकरता चांगले आहेत. 

शौच

शौच म्हणजे स्वच्छता. ही स्वच्छता तीन स्तरावर असते - शारीरिक स्वच्छता, मानसिक स्वच्छता आणि वातावरणाची स्वच्छता. शरीरिक स्वच्छतेसाठी स्नानाबरोबरच हठयोग अनेक शुद्धीक्रिया सुचवतो. धौती, नेती, बस्ती, नौली इत्यादी शुद्धीक्रियांनी शरीराची अंतर्गत शुद्धी होते. मानसिक शुद्धतेसाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. नामस्मरण, सत्संग, सातपुरूषांच्या शिकवणीचे वाचन-मनन-चिंतन इत्यादी गोष्टी फायदेशीर ठरतात. साधनेची आणि राहण्याची जागाही शुद्ध असावी लागते. त्यासाठीच शक्यतो साधनेला वेगळी खोली असावी असे सांगितले जाते. साधनेच्या जागी भांडणे, भौतिक इच्छा-आकांक्षासंबंधींचे विचार कटाक्षाने टाळले पाहिजेत. साधनेची जागा कशी असावी हे स्वात्मारामाने पूर्वी सांगितलेच आहे.

हे झाले योग्यांचे दहा यम. तुमच्या लक्षात आहे असेल की योगमार्गावर चालण्याची इच्छा नसलेल्या माणसांनाही ते आनंदी आणि समतोल आयुष्य जगण्यासाठी फार उपयोगी आहेत. पुढच्या भागात आपण योग्यांच्या दहा नियमांविषयी जाणून घेणार आहोत.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 25 October 2010


Tags : योग हठयोग कुंडलिनी चक्रे योगग्रंथ लेखमाला नाथ