Untitled 1

योग्यांचे दहा नियम

लेखमालेच्या मागील भागात आपण योग्यांच्या दहा यमांविषयी जाणून घेतले. या भागात आपण दहा नियमांविषयी जाणून घेणार आहोत. स्वात्माराम म्हणतो :

तप: संतोष आस्तिक्यम दानमीश्वरपूजनम।
सिद्धांतवाक्यश्रवणम ह्रिमती च जपो हुतम।
नियमा दश सम्प्रोक्ता योगशास्त्रविशारदै:।।    

तप, संतोष, आस्तिक्य, दान, इश्च्वरपूजा, सिद्धांतवाक्य श्रावण करणे, लज्जा, मती, जप, हवन हे योगशात्रातील तज्ञांनी सांगितलेले दहा नियम आहेत.

तप या शब्दाचा अर्था आहे तापवणे. योगशास्त्राच्या दृष्टीने शरीर आणि मनाला काही उपायांनी तापवणे म्हणजे तप. तापवल्याने गोष्टी शुद्ध होतात हा आपला दैनंदीन जीवनातील अनुभव आहे. शरीर आणि मनाचेही तसेच आहे. सर्वसाधारण माणूस शरीराला आणि मनाला फार लाडावून ठेवतो. मग ते त्याच्या ताब्यात रहात नाही. तपाचरणाने शरीर-मनाची शुद्धी होऊन ते योगसाधनेसाठी योग्य बनते. साधारणपणे तप म्हटले की एका पायावर उभे रहाणे, पाण्यात उभे रहाणे अशा काहीतरी कल्पना लोकांच्या मनात उभ्या रहातात. कालौघात तापाचे स्वरूपही बदलले आहे. सर्वांना आचरणात आणता येण्यासारखे आणि आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे एक तप म्हणजे उपवास किंवा एकभुक्त रहाणे. अर्थात हे केवळ एक उदाहरण सांगितले. अशी अनेक तपे सांगता येतील. कोणत्याही तपाचरणात शरीर-मनाला रोजच्या क्षमतेपेक्षा अधिक ताणणे हे महत्वाचे आहे. त्यामुळेच शरीर-मनाचा लाडावलेपणा कमी होवून त्याला शिस्त लागते.

अनेकदा असे दिसते की सर्वसाधारण मनुष्य आपल्या आयुष्यात नेहमी असमाधानी असतो. जे आहे त्यात समाधान न मानता अजून अपेक्षा करत बसतो. अशाने एक प्रकारची वखवख त्याच्या अंगात भिनते. आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत की मग दुसर्‍याच्या उत्कर्ष पाहून त्याचा जळफळाट होतो. दिवसरात्र अतृप्त इच्छांचे विचार आणि त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा यातच त्याच्या आयुष्यातील बराच काळ निघून जातो. योगसाधकाने संतोष अंगी बाणवला पाहीजे. हा फार महत्वाचा गुण आहे. रोजच्या जीवनात आजूबाजूच्या लोकांशी संपर्कात आल्याने त्यांच्या इच्छांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. एकीकडे वैराग्याकडे वाटचाल आणि दुसरीकडे भोगांविषयी सूक्ष्म स्तरावर आसक्ती असा विरोधाभास योगजीवनाला हानीकारक ठरतो. तेव्हा आपल्याला जे मिळत आहे ते परमेश्वरी इच्छेने असा भाव योगसाधकाने ठेवला पाहिजे आणि मिळेल त्यात संतोष मानला पाहिजे.

आस्तिक्य म्हणजे श्रद्धा किंवा विश्वास. ही श्रद्धा तीन गोष्टींवर असणे आवश्यक आहे. परमेश्वरावर, योगमार्गावर आणि आपल्या साधनेवर. आपण आधीच्या भागांत पाहिले की योगदर्शनात परमेश्वर या संकल्पनेला स्थान आहे. परमेश्वराची पाच कार्ये - उत्पत्ती, स्थिती, लय, निग्रह आणि अनुग्रह - प्रसिद्धच आहेत (शिवोपासनेवरील लेखमालेत मी त्यांविषयी विस्ताराने लिहिले आहे). असे समजा की एका स्वैपाकखोलीत चूल, पाणी, गहू, तांदूळ, डाळ, मीठ, मसाला अशी सर्व सामुग्री आहे. असे असले तरी स्वयंपाक आपोआपच तयार होईल का? अर्थातच नाही. कोणालातरी विस्तव लावून, त्यावर तांदूळ, डाळ शिजवून, आवश्यक प्रमाणात मीठ, मसाला घालून तो तयार करावा लागेल. जगाचेही असेच आहे. केवळ पृथ्वी, जल, अग्नी, वायू  आणि आकाश ही पंचभूते काहीच करू शकत नाहीत हे तर उघडच आहे. तरीही या विश्वातील प्रत्येक घडामोड सुसंबद्धरीतीने होताना दिसते. याचाच अर्थ "कोणाच्यातरी" इच्छेनुसार ही घडामोड होत असली पाहिजे. हा "कोणीतरी" म्हणजेच परमेश्वर. साधक जेव्हा आपली साधना सुरू करतो तेव्हा तो परमेश्वराचे अस्तित्व हे "आप्तवाक्य" म्हणून स्वीकारतो. जस जशी त्याची साधना दृढावते तसा तशी त्याला परमेश्वरी चैतन्याची अनुभूतीही येऊ लागते. अर्थात अशा प्रकारच्या दृढतेसाठी योगमार्गावर आणि आपल्या साधनेवर पराकोटीचा विश्चास असायला हवा. काही साधक असे असतात की ज्यांच्या मनात योगमार्गाविषयी आणि आपल्या साधंनेविषयी शंका-कुशंका येत असतात. शिवसंहितेत भगवान शिव पार्वतीला सांगतात -

आलोक्य सर्वशास्त्राणि विचार्य च पुनः पुनः।
इदमेकं सुनिष्पन्नं योगशास्त्रं परं मतम॥

अर्थात सर्व शास्त्रांचे अवलोकन करून आणि त्यांवर वारंवार विचार करून हे सुनिश्चित आहे की योगशास्त्र हेच सर्वश्रेष्ठ मत आहे. अशा प्रत्यक्ष फळ देणार्‍या मार्गाची वाटचाल साधकाने निःशंक मनाने केली पाहिजे.

पुढचा नियम आहे दान. साधारणत: दान कशासाठी करायचे तर समाजातील गोरगरीबांना मदत व्हावी म्हणून असा समाज असतो. हा दानाचा फायदा असला तरी योगसाधकासाठी तो दुय्यम आहे. योगसाधकाच्या दृष्टीने दानाचा सर्वात मोठा फायदा आहे संचय करण्याच्या वृत्तीपासून बचाव. भौतिक सुख मिळवण्यासाठी पैसा फार महत्वाचा आहे आणि भौतिकसुखांकडेचा बहुतेकांचा ओढा असल्यामुळे जेवढा पैसा अधिक तेवढे चांगले अशी वृत्ती बाणते. आजच्या काळात तर पैशाशिवाय पानही हालत नाही. असे असले तरी खरोखरची गरज आणि चैन यातील फरक साधकाने ओळखायला हवा. तुम्हाला ती "संन्याशाच्या लंगोटीची" गोष्ट माहितच असेल. तशी गत होऊ नये म्हणून योग्याला दान हा नियम सांगितला आहे. येथे हेही लक्षात ठेवले पाहिजे की दान फक्त पैशाचेच असले पाहिजे असे नाही. ज्ञानदान, सेवादान हे ही दानाचेच प्रकार आहेत.

इश्चरपूजन म्हणजे आपल्या आराध्यदैवताची स्थूल अथवा मानसोपचारांनी पूजा करणे. साधनेच्या सुरवातीला निर्गुण, निराकार परमेश्वर साधकाच्या मानसिक पकडीत येत नाही. त्यासाठी त्याला परमेश्वाचे काहीतरी प्रतीक गरजेचे वाटते. या प्रतीकाचे पूजन भक्तीचे पोषण करून परीणामी साधनेवर सुपरीणाम घडवून आणत असते. योग्याचे इश्चरपूजन म्हणजे कर्मकांड नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. पूजा पंचोपचारांनी केली की षोडशोपचारांनी यापेक्षा किती भक्तीभावाने केली ते महत्वाचे असते. योग्यासाठी उत्तम पूजा म्हणजे मानसपूजा. त्यासाठी पैसाही लागत नाही की आणि कोणतेही अवडंबर करावे लागत नाही. अर्थात साधनेच्या अप्रगत अवस्थेत स्थूलपूजनाचीच कास साधकाला धारावी लागते. कालांतराने आवश्यक भाव निर्माण झाल्यावर साधक मानसपूजा चांगल्याप्रकारे करू शकतो.

सिद्धान्तवाक्यश्रवण म्हणजे शास्त्रग्रंथांचे वाचन. रोजच्या आयुष्यात अनेक वाईट संस्कार साधकाच्या मनावर होत असतात. ते संस्कार कालांतराने सवय बनतात. या कुसंस्काराच्या प्रभावामुळे योगमार्गावरून पदच्युत होण्याचा धोका असतो. या कुसंस्कारांना सुसंस्कारांनी पुसून टाकण्यासाठी शास्त्रग्रंथांचे वाचन, श्रवण, मनन सांगितले आहे. थोडे विषयांतर वाटले तरी सांगतो. आजकालच्या साधकांमध्ये अशी भावना असते की वाचनाने ज्ञान मिळते. शाळा-कॉलेजच्या बाबतीत ते खरेही असेल पण अध्यात्मज्ञानाच्या बाबतीत नाही. योगमार्गावर पुस्तके ज्ञान देऊ शकत नाहीत. ती केवळ ज्ञानाकडे निर्देश करू शकतात. अध्यात्मज्ञान हे साधनेने आतूनच प्रगट होत असते. सिद्धान्तवाक्यश्रवण म्हणजे भारंभार पुस्तके वाचणे नव्हे हे लक्षात ठेवले पाहिजे. तेव्हा साधकाने ज्ञानेश्वरी, भगवत गीता यांसारखे आपल्या आवडीनुसार एक-दोनच ग्रंथ नित्य वाचनात ठेवावेत. त्यातील शिकवणीवर मनन-चिंतन करावे. असे करणे म्हणजेच खरे सिद्धान्तवाक्यश्रवण.

ह्री म्हणजे कोणतेही वाईट कृत्य करण्याविषयीची लज्जा. एकदा का मन यम-नियमांच्या विरुद्ध वागायला निर्ढावले की मग यम-नियमांचे महत्व वाटत  नाही. जोवर वाईट कृत्य करण्याविषयीची लाज वाटत असते तोवर सुधारणेस वाव असतो. एकदा का सद्सद्विवेकबुद्धीने मनाने टोचणे बंद केले की मग सुधारण्याची आशा मंदावते किंबहुना आपण सुधारावे असे वाटतही नाही. त्याकरता ह्री आवश्यक आहे.

मती म्हणजे बुद्धी. सत काय असत काय याचा विचार करू शकणारी बुद्धी. योगमार्गावर पदोपदी प्रलोभने विखुरलेली असतात. आपल्यापुढे असलेली गोष्ट शाश्वताकडे नेणारी आहे की अशाश्वताकडे याचा विचार करून ती गोष्ट स्वीकारायची की नाही हे ठरवावे लागते. शास्त्रग्रंथांतून आणि गुरूवाक्यातून मिळणारी शिकवण आचरणात आणण्यासाठी "मती" आवश्यक असते.

पुढील नियम आहे जप. हठयोगप्रदीपीकेच्या काही प्रतींमध्ये "जपो" च्या ऐवजी "तपो" असा पाठभेद आढळतो. तप आगोदरच सांगितले असल्याने परत "तपो" बरोबर वाटत नाही तेव्हा "जपो" असेच येथे स्वीकारले आहे. प्राचीन हठयोगी जरी प्रामुख्याने योगशास्त्राचे अभ्यासक असले तरी अनेकांचा तांत्रिकांशी संबंध येत असे. त्यामुळे मंत्रयोग हा त्यांच्या साधनेचा अविभाज्य घटक होता. मंत्रयोग म्हणजे केवळ नामजाप नव्हे. अनेक हठयोगी तांत्रिक बीजमंत्रांचा जप करतात. शिवसंहितेतील मंत्रयोगही अशाच स्वरूपाचा आहे. हा मंत्र सिद्ध असल्यास साधनेत प्रगती लवकर होते. असा मंत्र गुरूमुखातून घेतला जातो. जप हा मन ताळ्यावर आणण्याचा उत्तम उपाय आहे. सर्व प्रकारच्या साधकांसाठी तो उपयोगी पडतो. त्याचकरता जपाचा समावेश मूलभूत यम-नियमांमध्ये करण्यात आलेला आहे.

स्वातमारामाणे सांगितलेला शेवटचा नियम आहे हवन. हे हवन दोन स्तरावरचे आहे. स्थूल आणि सूक्ष्म. आताच आपणा पाहिले की हठयोग्यांचा मंत्रयोग हा तांत्रिक स्वरूपाचा आहे. तांत्रिक मंत्रसाधनेत हवन हा महत्वाचा विधी असतो. साधारणतः जपसंख्येच्या एक दशांश आहुती द्याव्यात असे मंत्रशास्त्र सांगते. कोणत्या पदार्थांनी आहुती दिली की काय फळ मिळते त्याचेही सांगोपांग विवेचन मंत्रशास्त्रात आढळते. हवन हा भागही तंत्रशास्त्रातून आलेला आहे. अर्थात असे हवन नामस्मरणाच्या मंत्राना लागू नाही. सूक्ष्म हवन हे भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणे प्राण आणि अपान यांचे असते. काही योगाग्रंथांमध्ये "हुतम" च्या ऐवजी "व्रतम" हा दहावा नियम धरला आहे.

तर असे हे यम-नियम. योगशास्त्राचे मंदीर यम-नियमांच्या वीस खांबावर भक्कमपणे उभे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की यम-नियम एका दिवसात आत्मसात करता येत नाहीत. तसा प्रयत्नही करू नये. याच कारणास्तव स्वातमारामाने यम-नियमांवर पुढे कोठेही अवाजवी भर दिलेला नाही.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 20 November 2010


Tags : योग हठयोग मंत्रयोग कुंडलिनी चक्रे साधना योगग्रंथ लेखमाला नाथ