देवाच्या डाव्या बाजूला
भाग 1 : लेखमालेचा परिचय
गेल्या वर्षी माझे Kundalini Yoga: Concepts & Practices
हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्या नंतर अनेक वाचकांची पत्रे व
Emails आल्या. त्यात बरेच प्रश्न,
शंका, गोंधळ आणि गैरसमज होते. अनेकांची कुडंलिनी जागृतिचे
अनुभव जाणून घेण्याची इछा होती. ही लेखमाला त्याचीच परिणती आहे. नवखा साधक ते
योगी ह्या मार्गावर बरेच अनुभव आले. ते सर्वच येथे मांडणे शक्य नाही. तसा विचारही
नाही. आपले
योगमार्गावरील अनूभव गुरु व्यतिरीक्त अन्य कोणालाही सांगू नयेत असा रूढ संकेत
आहे. त्याला फारसा छेद न देता ह्या लेखमालेतून नवीन साधकाला उपयोगी व आवश्यक असे
काही अनुभव प्रस्तूत करण्याचा मानस आहे.
बर्याचदा लोकांच्या मनात कुंडलिनी जागृति विषयी बरेच गैरसमज असतात. हे गैरसमज
बहुतांशी चुकिचे असतात. आजकाल कित्येक ढोंगी माणसे स्वत:ला गुरु म्हणवून घेताना
आढळ्तात. ज्यांची स्वत:ची कुंडलिनी जागृत झालेली नाही, ज्यांचा स्वत:चा अभ्यास नाही
अशी माणसे कुंडलिनी विषयी अधिकार वाणीने बोलताना दिसतात. त्यांना
गुरु बनण्याची व दुसर्याला योग शिकवण्याची घाई झालेली
असते. शिष्यही बर्याचदा आपली
मर्यादा सोडून वागताना आढळतात. संगणकाच्या कळी प्रमाणे बोट दाबताच आध्यात्मिक
प्रगती साध्य होईल अशी त्यांची अपेक्षा असते. तसे न झाल्यास ते आपल्या गुरुला व
अध्यात्म मार्गाला नावे ठेवू लागतात. हे चित्र बदलण्याची गरज
आहे. आज चांगल्या गुरु एव्हढीच (किंबहूना जास्तच) चांगल्या शिष्याचीही गरज आहे.
ह्या लेखमालेचे नाव कदाचित तुम्हाला गोंधळात टाकेल. पण त्याला एक गूढ अर्थ आहे.
हिन्दु धर्म ग्रंथांमध्ये शिव-शक्ति यांचे अतुट नाते आहे. शक्ति ही नेहमी शंकराच्या
डाव्या बाजूला विराजमान असते. शंकराचे वर्णन करतांना "वामे शक्ति धरम देवम" असेच
केले जाते. शंकराची हिच शक्ति मानवी देहामध्ये कुंडलिनी रुपाने वास करत असते.
कुंडलिनी जागरण हा तंत्रशास्त्राचा अविभाज्य घटक आहे. तंत्रशास्त्रातील शक्ति
उपासना ही खरेतर कुंडलिनीचीच उपासना आहे. श्रीकंठाचा आपल्या शक्तिवर पूर्ण ताबा
असतो. केवळ तोच तिला आपल्या मर्जी नूसार वागवू शकतो. म्हणून हे शिर्षक. हे तत्व
अर्थातच प्रत्यक्ष अनुभवातूनच कळणे शक्य आहे.
ह्या लेखमालेची सुरवात करण्यापूर्वी एक सांगावेसे वाटते की या अनुभवांकडे
डोळसपणे पहा. त्या मागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाचे साधनामार्गा
वरचे अनुभव वेगळे असतात. त्यांकडे नियम म्हणून न पहाता एक मार्गदर्शन म्हणून पहा.
इंटरनेटवर उपलब्ध अशी मराठीतील ही एकमेव लेखमाला आहे. आशा आहे की ही लेखमाला तुम्हाला नक्कीच आवडेल. जर इच्छा असेल तर
Mailing List चे सभासद व्हा. त्यासाठी तुमचा
Email address आम्हाला
Contact Us Page द्वारे
पाठवा. जेंव्हा नविन लेख उपलब्ध होतील तेंव्हा तुम्हाला
Email द्वारे कळवण्यात येइल. कृपया आपल्या मित्रांना,
ओळखीच्यांना व या विषयाची आवड असणार्या इतर साधकांना या लेखमाले विषयी अवश्य
सांगा. कुंडलिनी योग यथार्थ स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या आमच्या छोटयाशा
प्रयत्नात मदत करणार्या प्रत्येकाचे आम्ही शतश: आभारी आहोत.
जगद्नियंता श्रीकंठ सर्व साधकांना योग्य मार्ग दाखवो हिच त्याच्या चरणी
प्रार्थना.
सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी
|
About the Author
|
|
Bipin Joshi |
|
You can read more about the author here. |
|