गेल्या रविवारची गुरूपौर्णिमा - काही गोष्टी
गेल्या रविवारी म्हणजे 25 तारखेला गुरूपौर्णिमेच्या निमीत्ताने माझ्याकडून
ध्यानधारणा शिकलेले अनेक जण भेटून गेले. खंडीभर लोकांना शिकवण्यापेक्षा मोजक्याच पण
प्रामाणिक साधकांना शिकवण्याचे तत्व मी पाळतो. त्यातील बहुतेक
जण न चुकता कोणत्या ना
कोणत्या प्रकारे संपर्क ठेवतात. मग ते ई-मेल असो, दूरध्वनी वा प्रत्यक्ष भेट. गेल्या
रविवारीही त्यांच्यापैकी अनेक जण येऊन गेले. काहींनी
कामानिमीत्त परदेशात
जावे लागल्यामुळे वा काही अपरिहार्य कारणामुळे येण्याची इच्छा असूनही येणे शक्य झाले नाही
असे आवर्जून कळवले. दिवसभर कोण ना कोण येतच होते.
त्यांच्याशी बोलताना अनेक विषय निघत होते, प्रश्नोत्तरे होत होती. त्यातूनच
निवडलेले काही महत्वाचे मुद्दे जे सर्वांच साधकांना उपयोगी पडू शकतील ते येथे देत आहे. ही नोंद काहीशी विस्कळीत वाटण्याची
शक्यता आहे कारण हे सगळे मुद्दे वेगवेगळ्या साधकांशी झालेल्या बोलण्यातून काढलेले
आहेत.
सातत्याने साधना केल्याने फायदा दिसतोच
आलेल्यापैकी बहुतेकांना साधना केल्याचा फायदा जाणवत होता. छोट्या छोट्या
अनुभवांतून प्रगती होत आहे हे स्पष्टपणे कळत होते. मी त्यांना जे सांगत असतो की
अध्यात्ममार्ग 'प्रॅक्टिकल' आहे. ढिगभर पुस्तके वाचून काही उपयोग नाही. त्यापेक्षा
साधनेत वेळ घालवा. तो सल्ला त्यांनी बर्याचअंशी पाळला होता. दिलेली साधना ते
काटेकोरपणे करत होते. ध्यान म्हणजे काही संगणकाची कळ नव्हे की आज सुरू करा आणि
तक्षणी प्रगती. साधना शरीर-मनात मुरायला काही काळ हा लागतोच. काहींच्या बाबतीत हा
काळ कमी असतो तर काहींना अनेक वर्षे लागतात. पण नियमीत साधनेचा फायदा आज ना उद्या
दिसतोच.
योग हे जंगलात जाऊन करण्याची गोष्ट नाही
लोकांचा विनाकारण असा समज असतो की योग वा अध्यात्म ही सर्व जगाचा त्याग करून
आचरायची गोष्ट आहे. काहींना असे वाटत असते की रिटायर झाल्यानंतर या गोष्टी करता
येतील. हे समज तितकेसे बरोबर नाहीत. ध्यान शिकवताना मी श्रद्धा-सबुरी-शिस्त
ही त्रिसुत्री नेहमी सांगतो. ही त्रिसुत्री पाळली तर दैनंदीन व्यवहार सांभाळूनही
आध्यात्मिक प्रगती करता येते. किंबहुना साधनेचा फायदा दैनंदीन जीवनातही करून जीवन
सुखी करता येईल. हे करत असताना एखाद्याच्या मनी प्रखर वैराग्य प्रगटले
आणि त्याने योगजीवनाला पूर्णपणे वाहून घेतले तर गोष्ट वेगळी पण एरवीही वरील
त्रिसुत्री पाळून चांगली प्रगती करता येते.
नामस्मरणाने मनाला मॅग्नेट बनवा
आलेल्या काहींना ध्यान साधनेला नामस्मरणाची जोड देण्याची इच्छा होती. ते
सोपस्कार पार पाडल्यावर एकाने विचारले की 'Does number of
recitations make any difference or devotion alone is sufficient?' त्याचे
उत्तर आहे 'दोन्ही'. नामस्मरणात भक्ती प्रधान आहे हे खरे पण किती वेळा मंत्र म्हटला
जातो तेही महत्वाचे आहे. विषय नीट समजावा म्हणून मी त्याला लोहचुंबकाचे उदाहरण
दिले. समजा तुम्हाला एक लोखंडाचा तुकडा व एक लोहचुम्बक दिले आणि सांगितले की या
चुंबकाने तो लोखंडाचा तुकड्यात चुंबकीय शक्ती आणा. आता तुम्ही काय कराल? तर त्या
चुंबकाने त्या तुकड्यावर विशिष्ठ प्रकारे घर्षण कराल. जर तुम्ही अगदी काही वेळाच
घर्षण केलेत तर तो तुकडा भारला जाईल का? त्यात चुंबकीय शक्ती येईल का? अर्थातच
नाही. जेंव्हा तुम्ही अनेक वेळा घर्षण कराल तेव्हाच त्यात
चुंबकीय शक्ती येईल. मंत्राचेही असेच आहे. मंत्र गुरूमुखातून जरी घेतला असला तरी त्याचा
वारंवार जप घडलाच पाहिजे. जेवढा जप जास्त तेवढेच मन त्या मंत्राने शक्तीमान होईल.
म्हणूनच जप करताना वेग असा ठेवावा की ना हळूहळू ना अति वेगाने. नामस्मरणाचा मंत्र
उठता बसता, जेव्हा शक्य होईल तेव्हा मनात घोळवत ठेवला पाहिजे. त्याचबरोबर हे ही
लक्षात ठेवले पाहिजे की असे घोळवणे मुख्य साधनेला पर्याय ठरू शकत नाही. ठरल्या वेळी
साधना ही झालीच पाहिजे.
अध्यात्ममार्गावर विस्फोटक अनुभवांची अपेक्षा नको
काही वेळा साधक आपल्याला काही स्फोटक वा अत्यंत प्रखर असे अनुभव येतील अशांची अपेक्षा करत रहातो. सर्वांनाच असे प्रखर अनुभव येत
नाहीत. तुमची साधना, पूर्वकर्मे, सध्याची जीवनशैली, आहार अशा अनेक गोष्टींवर तुमचे
आध्यात्मिक अनुभव प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात. त्यामुळेच तर दोन
साधकांना त्यांचा गुरू आणि साधना एक असली तरी येणारा अनुभव मात्र वेगळा असतो.
दुसर्याला आले तसे अनुभव आपल्याला आले नाहीत म्हणून कुढत बसण्यात वा चिंता करण्यात
काहीच अर्थ नाही.
काय खातो आणि किती खातो ते महत्वाचे
आहाराला योगशास्त्रात खुप महत्व आहे. आहार सात्विक असेल हे कटाक्षाने पाहिले
पाहिजे. काहींच्या बाबतीत असे होते की भुक लागली की आवरताच येत नाही आणि मग पानावर
बसले की भरपेट जेवले जाते. अशांनी तिखट, मसालेदार पदार्थ विशेषकरून टाळले पाहिजेत.
अशा पदार्थांमुळे पाचकरस जास्त स्त्रवतात परिणामी भुक जास्त लागते. मानवी देहाची
रचना अशी आहे की जेऊन झाल्यानंतर दहा-पंधरा मिनीटांनी पोट भरल्याची जाणिव होत असते.
तेव्हा पोट पूर्ण भरण्यापूर्वीच पानावरून उठावे. दोन घास कमी खावेत. पानावरून
उठताना जरी भुक आहे असे वाटले तरी काही वेळाने पोट भरले आहे असे कळून येईल.
ध्येयाविषयी अवास्तव काळजी नको
साधक काही वेळा आपली प्रगती कधी होणार याची अवास्तव चिंता करत राहतो. तुम्ही
जेव्हा एखादा चित्रपट पहायला जाता तेव्हा आत्ता समोर काय चाललय त्याकडे लक्ष देत
असता. तीन तासांनंतर शेवट काय होणार याकडे नाही. समोरच्या दृष्यांमधे तुम्ही एवढे
गुंगून जाता की चित्रपटाचा शेवट कधी आला ते समजत सुद्धा नाही. योगमार्गावरही असेच
चालावे. साधनेतून आनंद मिळाला पाहिजे. तो आनंद उपभोगायला शिकले पाहिजे. असे करत
असताना एक दिवस अपेक्षित उद्दिष्ट साध्य होईल. तसे केले नाही तर मग साधना
यांत्रिकपणे घडते. रोज ठरल्या वेळी आसन टाकायचे, जप-ध्यान मोजून मापून करायचे आणि
ठरल्या वेळी आसन उचलायचे असा यांत्रिकपणा येतो. परमेश्वर प्राप्तीची कळकळ आणि
प्रगतीविषयीची अनावश्यक चिंता यात फरक आहे. तो नीट समजून घ्यावा.
ध्यान ही ग्रुपने करण्याची गोष्ट नाही
बोलता बोलता सामुहीक साधना वा गटाने जमून काही भजने वगैरे म्हणणे हा विषय आला.
व्यक्तिशः मला अशा सामुहीकपणे करण्यात येणार्या गोष्टी विशेष पटत नाहीत.
साधारणतः असे दिसते की अनेक ठिकाणी साधक एकत्र येतात, भजने वगैरे म्हणतात, काही काळ
एकत्र साधना करतात. अशा गोष्टींतून फक्त क्षणिक आनंद आणि उत्साह मिळतो. या गोष्टी
मन अजूनही बहिर्गामीच असल्याचे लक्षण आहे. तसाच प्रकार ध्यानाच्या
CD / DVD वगैरेंच्या बाबतीत होतो. CD
/ DVD ऐकत एके ठिकाणी आसन घालून बसणे म्हणजे काही ध्यान नव्हे. तो ध्यानाचा
फक्त आभास असतो. म्हणूनच लोकांना Guided Meditation जमते
पण एकांतात स्वतःचे स्वतःला ध्यान लावता येत नाही.
योगमार्गावर चर्चा-चर्वणे, वाद यांची किंमत शून्य
योगमार्ग हा प्रत्यक्ष अनुभवाचा मार्ग आहे. वितंडवाद,
चर्चाचर्वणे, पांडीत्याचे प्रदर्शन यांना योगमार्गावर फारशी किंमत नाही. काही साधक
असे असतात की त्याना नाना गोष्टी वाचण्यात फार रस असतो पण साधना करण्याच्या बाबतीत
मात्र ते आळस करतात. अशाने प्रगती कशी होणार? ज्याप्रमाणे साखरेचा डबा केवळ साखरेची
साठवण करू शकतो पण साखरेची गोडी काही चाखू शकत नाही त्याप्रमाणे असे साधक माहीती
बरीच साठवतात पण अनुभूती काहीच मिळवू शकत नाहीत. अगदी क्वचित थोडेफार अनुभव आलेच तर
लगेच आकाशाला हात टेकल्यासारखे वागू लागतात. जर तुम्हाला अध्यात्ममार्गावर अग्रेसर
व्हायचे असेल तर आपण फार माहितगार आहोत हा गर्व, अभिमान टाकून परमेश्वरचरणी लीन
व्हा. चर्चा करून काय होणार? अध्यात्माच्या गप्पा छाटत बसून काय होणार? त्यापेक्षा
साधनारत व्हा.
असो. संध्याकाळी सगळे आटोपल्यावर शिवचरणी पार्थना केली, "आज
आलेल्या सर्व साधकांना योग्य मार्ग दाखव. त्यांनी तुझ्याकडे चालायला सुरवात केली
आहे, त्यांना बोटाला धरून मातेच्या ममतेने असेच अग्रेसर कर."
This page is protected by copyright laws.
Copying in any form is strictly prohibited.
For Copyright notice and legal terms of use click here.