AddThis Feed Button
Bookmark and Share




Untitled 1

भाग 9 : नवी साधना व उत्स्फुर्त क्रिया

घरी परत आल्यावर आता साधना पुर्वीसारखी सुरू करायला हवी होती. साधनेला बसल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आजवर उत्साहानी केलेली साधना एकदम कंटाळवाणी वाटू लागली. एकाही साधनेत मन लागेना. केवळ सवय म्हणून साधना केली पण त्यात काही जीव नव्हता. असे का होतय ते कळेना. मनात सहज प्रेरणा (intuition) होऊ लागली की आता पुर्वीच्या साधना संपल्या. त्या आता काहीच उपयोगी नाहीत. अगदी तासनतास केल्या तरी आता त्यांतून काहीच फायदा होणार नाही. पुर्वीच्या साधना करायच्या नाहीत तर मग काय करायचे ते मात्र कळत नव्हते. बराच प्रयत्न केल्यावर कंटाळा आला. शवासन करून साधना संपवूया असे म्हणून चटई टाकली.  

शवासनात गेल्यावर हळूहळू मन शांत झाले. विचार कमी कमी होत गेले. शरिर शिथल झाले. साधारण पंधरा मिनिटे झाली असतील. त्या शिथल अवस्थेततच माझा एक हात जमिनिवरून आपोआप डोक़्याकडे सरकला. परत तोच विजेचा प्रवाह अंगातून खेळू लागला. एव्हाना मला ती संवेदना आवडू लागली होती. पहील्या वेळी वाटली तशी भिती वा आश्चर्य वाटत नव्हते. तो प्रवाह खेळू लागला म्हणजे 'काहीतरी' घडणार असे समीकरण मनाने नकळत मांडले होते. प्राण धावत होता. मी जे होईल ते केवळ साक्षी भावाने पहायचे असे ठरवले. करता करता एक वेळ अशी आली की झोपलेल्या स्थितीतच पोट आपसूक आत ओढले गेले व जालंधर बंध लागला. एवढा सुखद बंध मी कधीच अनुभवला नव्हता. असाच मुलबंधही लागला पण अगदी सैलपणे (कदाचित मी झोपलेलो होतो हे त्याचे कारण असेल). श्वास मंद मंद होत गेला व शेवटी थांबला! आपला श्वास अजिबात चालत नाहीये ही कल्पनाच जरा धक्कादायक होती. केवल कुंभकाविषयी जरी मी वाचले होते तरी स्वत: तो अनुभवताना काहीसे वेगळे वाटले. या वेगळे वाटण्यानेच मन विचलीत झाले व श्वास परत चालू झाला. केवल कुंभक काहीच सेक़ंद झाला असेल पण या अनुभवामुळे योगग्रंथातले एक सत्य मला स्वत:ला पुर्णपणे पटले. विचलीत झालेले मन परत शिथील होऊ शकले नाही. त्या दिवशीची साधना तेथेच संपवली.

दुसर्‍या दिवशीपासून माझ्या योगजीवनातील एक महत्वाचा टप्पा सुरू झाला. आता साधना काय करायची हा प्रश्न सुटला होता. आजवर मी स्वेच्छेने साधना करत होतो. आता जागृत कुंडलिनी त्या माझ्याकडून करवून घेऊ लागली. कुंडलिनी जागृतीतील हा काहीसा गूढ व चमत्कारीक टप्पा होता. ज्यांनी हा अनुभव घेतलेला नाही त्यांना ते नीट कळणार नाही. दुसर्‍या दिवशीपासून मी केवळ शिथील अवस्थेत बसू लागलो. जागृत कुंडलिनी जे काही करेल ते केवळ साक्षी बनून पहायचे. त्यात काहीही ढवळाढवळ करायची नाही. हे तत्व मी आत्मसात केले. लक्षात घ्या. हे तत्व वाटते तेव्हढे सोपे नाही. आयुष्यबर आपल्याला 'मी' पणा सोडत नाही. प्रत्येक घडणारी क्रिया 'मी' करत असतो. हा 'मी' बाजूला ठेवून कुंडलिनीच्या ताब्यात स्वत:ला सोपवणे सोपे नाही. त्या दिवसा नंतर माझी साधना पुर्णपणे बदलली. कधी कधी मी अर्धवट ध्यानाच्या तारेत शंकराची स्तोत्रे वा तंत्र ग्रंथातील श्लोक गात सुटे. एकटाच श्रीकंठाशी वा देवीशी बडबडत बसे. कधी त्या तंद्रीमधे तंत्रोक्त देवीरुपांचे आभास होत. कधी रात्री झोपेतून अचानक जाग येई व जाणीव होत असे की आपण काही प्राणायाम व बंध सदृश्य क्रिया करत आहोत. साधनेला बसल्यावर प्राणायाम, कुंभक, बंध, मुद्रा, ध्यान आपोआप घडू लागत. काही मुद्रा ज्यांचा मी कधी अभ्यासही केला नव्हता त्या होत. त्या विषयी मला येथे फारसे विस्तृतपणे लिहीता येणार नाही पण एक मात्र नक्की की हठ ग्रंथातील अशक्य वाटणार्‍या काही क्रिया कुंडलिनी जागरणानंतर अगदी चुटकीसरशी होऊ लागतात. गंमत म्हणजे या क्रिया केवळ साधनेला बसल्यावरच होत असत. साधनेनंतर प्रयत्न करूनही मला त्या करता येत नसत. 'कुंडलिनी ही सर्व योगसाधनेचा पाया आहे' असे योगग्रंथ का म्हणतात ते मला कळू लागले होते.

अशीच एक दिवस स्वप्नात धडलेली 'ती' साधनाही माझ्याकडून करवली गेली. त्या साधेनेमुळे माझा ध्यानाविषयीचा द्रुष्टीकोणच बदलला. प्रगाढ ध्यानात जाणे कठीण असते असा जो सर्वसाधारण समज असतो (त्या दिवसापर्यंत माझाही तसाच होता) तो पार खोटा ठरू लागला. तासनतास गाढ ध्यान लागू लागले. माझ्या या क्रियेच्या अनुभवावरून पुढे मी एक ध्यानपद्धती विकसीत केली. माझ्याकडे योग शिकण्यासाठी येणार्‍या साधकांना मी ती शिकवू लागलो. होणार्‍या उत्स्फुर्त क्रिया हळू हळू कमी कमी होत गेल्या. क्रिया कमी झाल्यास मला वाटे की आपले काही चुकत तर नाहीना. करता करता एक दिवस असा आला की स्थूल क्रिया (जसे मुद्रा व शारिरीक हालचाली) होणे अजिबात थांबले. त्याच बरोबर ध्यानाची तीव्रता मात्र खूप वाढली. त्यामुळे 'आपले काही चुकत तर नाहीना' ही भावना कमी होत गेली व आपण योग्य दिशेने प्रवास करत आहोत ह्याची खात्री पटत गेली.  काही उत्स्फुर्त क्रिया म्हणजे सर्वस्व नाही. तो केवळ एक छोटा टप्पा आहे. त्याही पुढे बरेच काही आहे. ही महत्वाची गोष्ट मी यातून शिकलो.

या नंतरची साधना म्हणजे साक्षात आनंदच. रोज साधनेला कधी बसायचे याची मी वाट पाहत असे. रोजच्या वेळे आधीच मी साधनेच्या खोलीत शिरत असे. साधनेचे ते सर्वसाधारण नियम सांगितले जातात (जसे भरल्यापोटी साधना करू नये, स्नानानंतर साधना करावी इत्यादी) त्यांविषयी फारसे काटेकोर राहणे मी सोडून दिले. साधनेचा आनंदच एवढा असे की त्या पुढे बाकीचे सारे तुच्छ वाटे. सहज प्रेरणा मला खात्रीने सांगे की हे नियम पाळण्याची आता गरज नाही. मी माझा आहार निम्य्यावर आणला (किंबहूना तो तसा झाला) जेणे करून चयापचयात फार उर्जा वाया जावू नये. त्या मुळे तासनतास ध्यानाला बसले तरी झोपाळल्यासारखे अजिबात वाटत नसे. 

काही महीन्यांनी जागृत शक्ती स्थिरावली. नवी साधना व्यवस्थित बसली. त्या बरोबर मनात सहज प्रेरणा होऊ लागली की दुसरी नोकरी करण्याची वेळ जवळ येत आहे. मी जेव्हा जेव्हा संन्यासाचा विचार करी तेव्हा तेव्हा आतूनच जगदंबा कुंडलिनीचा प्रबळ आवाज येत असे - मला तुझ्या कडून याच जगात काही कर्मे करवून घ्यायची आहेत. ती केल्याशिवाय तुझी सुटका नाही.  त्या आज्ञेला शिरसावंद्य मानून मी दुसरी नोकरी शोधण्याच्या मागे लागलो. 

~~~~~~

कुंडलिनी जागृतीनंतर होण्यार्‍या क्रिया हा नेहमीच एक गुढतेचे व भीतीचे वलय असलेला विषय. ह्या क्रिया का होतात याबाबत तज्ञांचे एकमत नाही. काही तज्ञांच्या मते ही एक शुद्धीची प्रक्रिया आहे तर काहींच्या मते हे अनावश्यक व धोकादायक आहे. साधारणत:  शक्तीपातवाले गुरु पहील्या प्रकारात मोडतात तर राजयोगाचे व भक्तीयोगाचे पुरस्कर्ते दुसर्‍या प्रकारात मोडतात. काहीही असले तरी त्यांमधे एकवाक्यता नाही हे उघड आहे. येथे मी माझी मते माझ्या अनुभवांवरून देत आहे.  

मानवी व्यक्तीमत्व पंचकोषानी बनलेले असते. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय हे ते पाच कोष. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा या पंचकोषांमधे परिवर्तन घडायला सुरवात होते. साधकाच्या शरिर-मनाच्या जडणघडणीनुसार हे परिवर्तन उत्स्फुर्त क्रियेंच्या रुपाने दृगोचर होते.  साधारणत: लोकांचा असा समज असतो की या क्रिया केवळ शक्तीपातामुळेच होतात. ते बरोबर नाही. शक्तीपाताने कुंडलिनी जागृत होते व या जागृत शक्ती मुळे क्रिया घडतात. ज्यांनी अन्य मार्गांनी कुंडलिनी जागृत केली आहे त्यांनाही अशा क्रिया होतातच. बर्‍याचदा असे आढळते की शक्तीपात घेणार्‍या साधकांनी कोणतीही पुर्वतयारी (जसे शरिर शुद्धी, जप, ध्यान-धारणा) केलेली नसते. अशा लोकांमधे या क्रिया फार तीव्र स्वरूपात दिसतात तर ज्यांनी ही तयारी केली आहे त्यांच्या बाबतीत त्या मंद स्वरूपात दिसतात.

जेव्हा कुंडलिनी पंचकोषात परिवर्तन घडवून आणते तेव्हा साधक वरकरणी फार विचित्र अशी लक्षणे दाखवू लागतो. तो कधी रडतो, कधी रडतो, किंचाळतो, जमिनीवर गडाबडा लोळतो, चालता चालता डोलतो. ही लक्षणे पाहून बर्‍याचदा साधक घाबरतात. आपल्याला वेड तर लागले नाही ना अशी भिती त्यांना वाटते. पण या क्रिया शरिरात जागृत झालेली कुंडलिनी स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत असल्याची खूण आहे. त्याच बरोबर या क्रिया साधकाच्या शरिर-मनावर झालेले जन्मोजन्मीचे संस्कार खरवडून काढत असते. वर सांगितलेल्या क्रिया तशा कमी प्रतीच्या आहेत. त्यांनंतर योग क्रियांना सुरुवात होते. प्राणायाम, बंध, खेचरी मुद्रा, शांभवी मुद्रा इत्यादी गोष्टी साधक आपोआप करू लागतो. हे काही वाचकांना भितीदायक वा अनैसर्गिक वाटेल पण त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही. साधकाच्या मानसीक अवस्थेमधेही बराच फरक पडू शकतो. कधी त्याचे 'मुड्स' प्रचंड प्रमाणात बदलतात. मनात सतत चलबिचल होते. ध्यान नीट लागत नाही. वासना फणा काडून उभ्या राहतात. यावेळी यम-नियमांनी मन बळकट करण्याचा प्रचंड फायदा तुम्हाला समजेल. या क्रियांच्या दिव्यातून गेल्यावर मग खरी साधना सुरू होते. ही नवी साधना अनुभवल्यावर तुम्हाला वाटेल की तुम्ही इतकी वर्षे केलेली साधना म्हणजे खरी साधना नव्हतीच! असो. सांगायचा मुद्दा असा की साधकाने न घाबरता या सर्व अनुभवांना सामोरे जाण्याची मानशिक तयारी केली पाहीजे.

काही लोक या क्रियांना विनाकारण अती उच्च पातळीवर नेऊन ठेवतात. हे म्हणतात की साधकाचे किंचाळणे म्हणजेच मंत्रोच्चारण होय. साधकाचे वेडेवाकडे अंगविक्षेप म्हणजेच आसने होत इत्यादी. पण हे बरोबर नाही. क्रियांना अकारण अवाजवी महत्व दिल्याने साधकाचा असा समज होतो की या क्रिया कायम व्हायलाच पाहीजेत. त्या थांबल्या तर त्याला वाटते की काहीतरी चुकले तर नाही? या क्रिया म्हणजे सर्वस्व नाही. त्या येतात व जातात. ध्यानाची अत्कट अवस्था प्राप्त झाल्याशिवाय तुमची प्रगती झाली असे म्हणता येणार नाही. 

या घडणार्‍या क्रिया सर्वच साधकंच्या बाबतीत सारख्याच असतात असे नाही. उदाहरणार्थ माझ्या बाबतीत मी स्वप्नात अनुभवलेली क्रिया करवून घेतली गेली. ही क्रिया माझ्या कडून जशी करवण्यात आली तशी ती कोणत्याही योगग्रंथात उपलब्ध नाही. त्यातील काही भाग तुटक स्वरूपात आढळतो पण तेवढेच. याच क्रियेला पुढे मी एका ध्यान पद्धतीत विकसीत केले.

कधी कधी मला असा प्रश्न पडतो की प्राचीन योग्यांनी खेचरी सारख्या मुद्रा कशा शोधल्या असतील? ज्यांनी हठयोग प्रदिपीका वाचली असेल त्यांना खेचरी मुद्रा करण्यासाठी काय दिव्यातून जावे लागते ते माहीतच असेल. जिभेचे छेदन, दोहन अनेक काळ केल्यावर जीभ दशम द्वाराच्या मार्गात शिरू शकते. योग्यांना हे कसे कळले असावे की जीभ तेथे घुसवल्याव मन कमालीचे शांत होते व समाधी सुलभ होते? असे तर नसेल की त्यांच्या पैकी कोणाचीतरी कुंडलिनी अशीच जागृत झाली असेल व त्याला या क्रिया आपोआप घडल्या असतील. त्याने या अत्स्फुर्त क्रिया मग जाणीवपूर्वक केल्या असतील? इतरांनीही मग त्या साद्ध्य करण्यासाठी छेदन, दोहन अशा कृत्रिम साधनांचा वापर केला असेल. याचे खरे उत्तर काळाच्या उदरात गडप झालेले आहे. ते उत्तर काहीही असो पण या क्रिया साधकाला अनोखी अनुभूती देतात एवढे मात्र नक्की. 

(क्रमश:)

जर इच्छा असेल तर आपण आमच्या Mailing List चे सभासद होऊ शकता. त्यासाठी तुमचा Email address आम्हाला Contact Us Page द्वारे पाठवा. जेंव्हा नविन लेख उपलब्ध होतील तेंव्हा तुम्हाला Email द्वारे कळवण्यात येइल. कृपया आपल्या मित्रांना, ओळखीच्यांना व या विषयाची आवड असणार्‍या इतर साधकांना या लेखमाले विषयी अवश्य सांगा. कुंडलिनी योग यथार्थ स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या आमच्या छोटयाशा प्रयत्नात मदत करणार्‍या प्रत्येकाचे आम्ही शतश: आभारी आहोत.




Posted On : 11 Sep 2008
Current Rating :
Rate This Article :

About the Author
Bipin Joshi
You can read more about the author here.


Copyright (C) Bipin Joshi. All rights reserved.
Contact Us
Read Terms Of Use