Untitled 1
भाग 4 : मी नोकरी सोडतो
साधना हळूहळू दृढावत होती. मन आध्यात्माकडे अधिकच आकर्षिले जात होते. या
सगळ्याचा परिणाम असा झाला की माझे अन्य गोष्टींवरील लक्ष उडाले. माझ्या नोकरीतील
कामावरही त्याचा परिणाम झाला. कशात लक्ष लागेना. सतत साधनारत रहावे, इश्वरचिंतन
करावे असे वाटत असे. बरं माझ्या मनातले कोणाला सांगावे तर 'एव्ह्डया लहान वयात देव
देव कशाला करतोस. त्यापेक्षा कामात लक्ष दे.' असा सल्ला मिळण्याची भिती.
लहानपणापासून मी अबोल. त्यातच योगसाधनेमुळे मी अधिकच अंत:र्मुख झालो. मी लोकांमधे
फारसा मिसळत नसे. आपण बरे की आपले काम बरे असा माझा दृष्टीकोन होता. त्यामुळे माझे
सहकारी, वरिष्ठ मला एकलकोंडा समजत असत. काही माझ्या मागे तसे बोलूनही दाखवत. मला ते
कळत होते पण ही स्थिती बदलावी असे वाटत नव्हते. मी चारचौघां सारखा माणसात मिसळलो तर
त्यांच्या भौतिक इच्छा आकांक्षांचा मला संसर्ग होईल असे वाटे. ते बर्याच अंशी
खरेही होते. असे करता करता एक दिवस असा उजाडला की मी ठरवले - नोकरीला रामराम
ठोकायचा!
मनाची तयारी सुरू केली. थोडी आर्थिक बचतही सुरू केली. त्याच सुमारास संगणक
क्षेत्रात बरीच वाढ होत होती. नोकरी सोडून प्रथम
आध्यात्मिक उन्नती साधायची व त्यानंतर वाटल्यास दुसरी नोकरी शोधायची असा विचार
केला. बरोबरीने विचारमंथन चालूच होते. आपण हा निर्णय भावनेच्या आहारी जाऊन तर घेत
नाही ना? आजच्या जीवनशैलीला अनुसरुन हा निर्णय आहे का? जर आपल्या मनासारखे यश
मिळाले नाही तर काय करायचे? अशा अनेक प्रश्नांवर सखोल विचार केला. माझी अंत:प्रेरणा
मला प्रोत्साहन देत होती. अखेरीस एक दिवस मी राजिनामा दिला.
नोकरी सोडतांना मला थोडा अनपेक्षित असा त्रास सोसावा लागला. माझ्या काही
वरिष्ठांनी केवळ मी नोकरी सोडतोय याचा राग म्हणून विनाकारण त्रास देण्यास सुरवात
केली. इतके दिवस प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे हे बक्षिस मिळताना पाहून मला वाईट
वाटले. या अन्याया विरुद्ध देवाकडे तक्रार करायची असे मी ठरवले. पण गंमत पहा.
ध्यानाला बसल्यावर मी ही तक्रार करूच शकलो नाही. प्रत्येक वेळी माझे मन कोरे होऊन जाई. जणुकाही देव मला
सुचवत होता की शत्रुबद्दलही वाईट विचार करणे साधकासाठी योग्य नाही.
तक्षणी मी देवाच्या तसबिरी समोर उभा रहिलो. डोळे मिटून हात जोडले. मनोमन प्रार्थना
केली - 'देवा। तू मला वाचवलेस! त्यांना माफ कर. त्यांना सद्बुद्धी दे जेणेकरून ते
राग-द्वेष यांच्या आहारी न जाता विचार करू शकतील.' या प्रार्थनेबरोबर खुप हलके
वाटले. कोण चांगला? कोण वाईट? कोण शत्रू? कोण मित्र? हे सारे तर आपल्याच भावभावनांचे खेळ आहेत. मनातील
कटुता कुठच्या कुठे पळाली. डोळे उघडले तेंव्हा निरंजनाच्या प्रकाशात तसबिर मंद
स्मित करत होती. योगमार्गावर एक महत्वाचा धडा मी शिकलो होतो.
~~~~~~
योगमार्गावर साधकाने संभाव्य चुकांपासून सावध राहिले पाहिजे. पतंजलीच्या
योगसूत्रांमधे तसेच हठेयोग प्रदिपीके मधे साधना मार्गावरील चुकांचे वर्णन आहे. ते
साधकांनी अवश्य वाचावे. येथे त्याची फारशी पुनरावृत्ती करत नाही. आजच्या काळाला
अनुसरून होणार्या काही चुका खाली देत आहे. त्यावर नीट विचार करावा.
तुम्हाला जर योगी व्हायचे असेल तर तुमची सारी शक्ती आध्यात्मिक साधनेसाठी खर्च
होऊ द्या. व्य्रर्थ बडबड, गप्पा इत्यादींत ती दवडू नका. आपले
मित्र अतिशय काळजीपुर्वक निवडा. तुम्ही जर राग, लोभ, मोह, मत्सर इत्यादींनी
पछाडलेल्या व्यक्तिंच्या सहवासात राहिलात तर त्या विकारांचा संसर्ग तुम्हालाही होईल.
तेंव्हा अशी संगत टाळा. जमेल तेंव्हा एकांतात मौन पाळून रहा. मौनात एक ताकद असते.
हा वेळ तुम्ही आत्मविश्लेषणामधे व्यतीत करू शकता.
आज मुबलक योग साहित्य उपलब्ध आहे. बरेच साधक भारंभार पुस्तके वाचतात,
CDs/DVDs बघतात. हे तितकेसे बरोबर नाही. अशाने
मन गोंधळून जाते, विखरून जाते. असे वाचन आपल्या पांडित्याचे प्रदर्शन
करण्यासाठी उपयोगी पडेल पण आध्यात्मिक उन्नतीसाठी या वाचनाचा काही उपयोग नाही. काही
साधक ज्ञान मिळवणे म्हणजे भरपुर वाचन करणे असा अर्थ घेतात. तो सपशेल चुकीचा आहे.
खरे ज्ञान हे आतून प्रगट होत असते. तेंव्हा आपल्या साधनामार्गाशी
मिळतीजुळती अशी काही निवडक पुस्तकेच वाचा. तीही केवळ प्रेरणा मिळण्यासाठी.
जे वाचलेत त्यावर चिंतन, मनन करा. आपल्या योगजीवनात ते कसे आमलात आणता येईल ते पहा.
कुंडलिनी योगमार्गात बर्याच साधना आहेत. साधकांना बर्याचदा असे वाटले की जास्त
प्रकारच्या क्रिया वा साधना केल्या तर जास्त फायदा होईल. हे चुकीचे आहे.
मोजक्याच साधना करा. त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या. त्यामधे नियमीतता
असू दे. कठीण साधना म्हणजे लवकर यश असा काही नियम नाही. ज्या साधना आवडतील, जमतील
त्या निवडा. जर गुरूने साधना दिल्या असतील तर त्याच करा.
स्वत:च्या मनानेच त्यामधे बदल करू नका. लक्षात ठेवा की साधना ह्या काही उद्दिष्ट
नव्हेत. एक दिवस असा येईल की तुमच्या सार्या साधना आपोआप थांबतील. त्यावेळी
तुम्हाला आत्म्याचा निरंजन प्रकाश दिसेल. साधनांचे उद्दिष्ट मनाला अ-मन
बनवणे आहे. ते उद्दिष्ट जर साध्य होत नसेल तर अश्या साधनांचा काहीच उपयोग
नाही.
योगमार्ग म्हणजे काही डिग्री अथवा डिप्लोमा नाही की जो ठराविक वर्षांमधे पूर्ण
होईल. प्रत्येक साधकाची स्वत:ची अशी गती असते. पुर्वकर्मे व साधनेतील
परिश्रम यांवर बरेच काही अवलंबून असते. बरेच साधक काही काळ एखाद्या गुरूला
follow करतात. काही शिकवण मिळवतात. काही काळाने त्यांची
त्यातील गोडी संपते. मग दुसरा मार्ग, दुसरा गुरू. असा दृष्टिकोन तुम्हाला योगी बनवू
शकणार नाही. एक मार्ग, एक गुरू, एक ध्येय ठेवा व त्यासाठी मनापासून परिश्रम
करण्याची तयारी ठेवा. गुरू हा काही जादुगार नव्हे. तो तुम्हाला मार्गदर्शन
करून योग्य वाटेवर हाताला धरून पुढे नेऊ शकतो पण याचा अर्थ तुम्हाला परिश्रम करणे
गरजेचे नाही असा होत नाही. गुरू हा काही 'आध्यात्मिक हमाल' नाही की जो तुमच्या
पुर्वकर्मांचे व चुकांचे ओझे वाहिल. तशी अपेक्षा ठेवणे हे तुम्ही आळशी व ऐतखाऊ
असल्याचे लक्षण आहे.
सर्वच साधना मार्गांमधे यम-नियमांना महत्व देण्यात आले आहे. बरेच साधक
दिवसातल्या ठराविक वेळी साधना तर करतात पण इतर वेळी अनिर्बंध आयुष्य जगतात. त्यांचा
युक्तिवाद असा असतो की मानवी मुल्ये ही देश, काळ व समाज यांच्या बरोबर बदलतात.
उदाहरणार्थ एखाद्या देशात ब्रम्हचर्याकडे नैतिक मुल्य म्हणून पहिले जात असेल तर
दुसर्या एखाद्या देशात तसे असणार नाही. म्हणजेच ब्रम्हचर्य हे काही शाश्वत मुल्य
नव्हे असे त्यांचे म्हणणे असते. अशा साधकांना माझे सांगणे आहे की हा
निव्व्ळ बौद्धीक वितंडवाद सोडून द्या. प्रथम तुमच्या आयुष्यातील मुल्ये काय आहेत ते
पहा. दुसर्याचे नंतर पाहता येईल. ज्या नैतिक मुल्यांकडे तुम्ही कानाडोळा
करत आहात ती अवलंबून पहा. त्यांच्या पालनाने साधनेवर होणारा सुपरिणाम अनुभवा. तो न
अनुभवताच त्या मुल्यांचा त्याग करणे हे काही सुज्ञ पणाचे लक्षण नव्हे. एकदा का
तुम्हाला त्यांचे महत्व लक्षात आले की तुम्ही असा शुष्क तार्किक वाद घालणार नाही.
ह्या सुचनांकडे लक्ष देऊन मनाची बैठक तयार केलीत तर सुपरिणाम लवकरच दिसून येतील
हे नक्की.
(क्रमश:)
जर इच्छा असेल तर
आपण आमच्या
Mailing List चे सभासद होऊ शकता. त्यासाठी तुमचा
Email address आम्हाला
Contact Us Page द्वारे
पाठवा. जेंव्हा नविन लेख उपलब्ध होतील तेंव्हा तुम्हाला
Email द्वारे कळवण्यात येइल. कृपया आपल्या मित्रांना,
ओळखीच्यांना व या विषयाची आवड असणार्या इतर साधकांना या लेखमाले विषयी अवश्य
सांगा. कुंडलिनी योग यथार्थ स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या आमच्या छोटयाशा
प्रयत्नात मदत करणार्या प्रत्येकाचे आम्ही शतश: आभारी आहोत.
|
About the Author
|
|
Bipin Joshi |
|
You can read more about the author here. |
|