Untitled 1
भाग 2 : एक विचित्र घटना
एक संथ, शांत व काहीशी कंटाळवाणी दुपार. माझा पहिला वहिला पगार नुकताच हातात
पड्ला होता. सगळ्यांना 'पहिल्या' गोष्टींच जस अप्रूप वाटत तसच मलाही होतं.
अर्धा दिवसांच्या सुटी नंतर ऑफिस मधुन निघालो. येतांना काही मित्रांना भेटायला
गेलो. माझ्या सारखाच बहुतेकांचा पहिला पगार झाला होता. साहजिकच गप्पांचा ओघ पहिल्या
पगारा भोवती घुटमळत होता. कोणाला घरच्यांना व मित्रांना पार्टी द्यायची होती तर
कोणाला खरेदी करायची होती. घरी परतताना आपण पहिल्या पगाराचे काय करावे हा विचार
मनात घुटमळत होता. विचारांच्या तन्द्रीतच रेल्वे स्टेशनात घुसलो आणि एक विचित्र
गोष्ट घडली...
फलाटाच्या दुसर्या टोकाला एक म्हातारा फेरीवाला जुनी-नवी पुस्तके मांडून बसला
होता. पुस्तकांच्या त्या पसार्याकडे माझे पाय नकळत वळू लागले. एक सुप्त आकर्षण मला
लोहचुंबका सारखे खेचत होते. एखाद्य़ा कठपुतळीच्या बाहूली सारखा मी हलत होतो. मन
जणूकाही सुन्न, जडवत झाले होते. जणू माझे स्वतंत्र अस्तित्वच कोणीतरी हिरावून घेतले
होते. कोणत्याशा एका मातकट पुस्तकाकडे मी यंत्रवत बोट दाखवले. त्या म्हातार्या
विक्रेत्याने आनंदाने ते पिशवीत कोंबले व माझ्या हाती ठेवले. मी खिशातून हाताला
येतील ते पैसे त्याच्या हातावर ठेवले व उरलेले पैसेही न घेता चालू लागलो.
वार्याच्या एक-दोन झूळका अंगावरून गेल्यावर चित्त थार्यावर आले. मनात प्रचंड
खळबळ माजली होती. हे काय चाललय? मी ते पुस्तक का घेतले? तेही मनात काही इच्छा
नसताना? कोणाच्या दबावाखाली मी ते घेतले? शरिराला हलका घाम फुटला होता. तशाच
अवस्थेत घरी पोहोचलो. लक्षात आले की आपण ते पुस्तक कोणते आहे तेही बघितलेले नाही.
मनातली उत्सुकता दाबत मी ते पुस्तक बाहेर काढले. ती होती भावार्थ दिपीका उर्फ
ज्ञानेश्वरी. माझ्या पहिल्या पगाराने नकळत स्वत:साठी घेतलेल्या ह्या भेटीने माझ्या
आयुष्याचे वळणच बदलून टाकले.
~~~~~
माणूस आध्यात्माकडे का वळतो? कधी आयुष्यातील अडीअडचणींना कंटाळून, कधी सांसारीक
जबाबदारींतुन सुटका म्हणून तर कधी परमेश्वर प्राप्तीच्या खर्या ओढीने. भक्तांचे
चार प्रकार आहेत - आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. सामान्य साधकाच्या
द्रुष्टीने पहाता हे चार प्रकार
प्रत्यक्षात प्रगतिचे टप्पेच आहेत. सामान्य साधक प्रथम केवळ संकट काळीच देवाचा धावा
करतो. त्या नंतर तो भौतिक सुखां साठी परमेश्वराला भजतो. कालांतराने भौतिक सुखांमधील
फोलपणा त्याच्या लक्षात येतो आणि त्याला भगवंताच्या स्वरुपाविषयी कुतुहल निर्माण
होते. हे कुतुहल शमले की तो केवळ ज्ञानप्राप्तीसाठी परमेश्वराला साकडे घालतो.
काही लोक बळजबरीने स्वत:ला अध्यात्मिक मार्गावर ढकलतात. हे तितकेसे बरोबर नाही.
जीवनाच्या कोणत्यातरी वळणावर ही ओढ आपोआप निर्माण होते. पूर्व कर्मांनूसार
कोणाला ती लवकर निर्माण होते तर कोणाला आयुष्याच्या अखेरीस. मी स्वत:ला सुदैवी
समजतो की माझ्या आयुष्यात ती वेळ तरुणपणीच आली अणि त्याचा मला चांगलाच फायदा झाला. एक व्यावहारीक उदाहरण देतो. तुमच्या
पैकी काहींनी कधी घरासाठी कर्ज घेतले असेल. ज्यांनी नोकरी लागल्या लागल्या कर्ज
घेतले असेल असे लोक ते पूढच्या 15-20 वर्षांत फेडतात व मग कोणताही बोजा डोक्यावर न ठेवता
मस्त पैकी आयुष्य ऐंजॉय करतात. अध्यात्मिक मार्गाचेही अगदी तसेच आहे. तुम्ही
जेव्हढी लवकर सुरवात कराल तेव्हढे लवकर तुमच्या
उद्दीष्टाप्रत पोहोचाल आणि त्यानंतर तेव्हढा
जास्त आत्मानंद प्राप्त करू शकाल. असो.
या वेब साईट मूळे माझा जगभरातील शेकडो लोकांशी संबन्ध येतो. त्यातील बरेचजण मला
विचारतात की योगाधिष्ठीत आयुष्याची सुरवात कशी करावी. मी जेंव्हा त्यांना सांगतो की
योग जीवन हे तलवारीच्या धारेवरून चालण्या सारखे आहे तेंव्हा त्यातिल बहुतांश लोक
निराश होतात. जे निराश होतात त्यांच्याकडे योगी बनण्यासाठी लागणारी मुल्ये जपण्याची
वा आत्मसात करण्याची तयारी नसते. असे लोक कधीच योगी होवू शकत नाहीत. जे आपल्या अथक
प्रयत्नांनी योगमार्गात येणार्या अडचणींशी मुकाबला करण्यास तयार असतात तेच
पैलतीरावर पोहोचू शकतात. योग म्हणजे काही मिठाई नव्हे की जी खाल्ल्यावर लगेच आनंद
देईल. योग औषधासारखा आहे. सुरवातीस आचरणास कडू पण शेवटी हट्टी रोग घालवून आनंद
देणारा.
तुम्हाला जर योगी व्हायचे असेल तर स्वत:ला खालील प्रश्न विचारा:
1. मला योगी का व्हायचे आहे?
2. त्या साठी लागणारी पात्रता माझ्या अंगी आहे का? नसल्यास ती कमवण्याची माझी तयारी
आहे का?
3. किती कालमर्यादेत माझे उद्दीष्ट साध्य व्हावे असे मला वाटते? जर ते तसे झाले
नाही तर माझी भूमिका काय असेल?
4. योगमार्गाला वाहून घेतल्यानंतर माझे आयुष्य कसे असावे असे मला वाटते?
लक्षात घ्या. हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. बहुतांशी साधक स्वत:ला हे प्रश्न
कधीच विचारात घेत नाहीत. कालांतराने त्यांचा भ्रमनिरास होतो. ते आपला मार्ग व गुरू
वारंवार बदलतात. अखेरीस आपली फसगत झाली असे वाटून ते योगमार्गाला व गुरुला नावे
ठेवू लागतात. या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे तुम्हाला तुम्ही किती पाण्यात आहात ते
दाखवतिल. ह्या प्रश्नांची उत्तरे केवळ मनातच घोळवू नका. ती कागदावर लिहून काढा. गरज
भासल्यास एखाद्या तज्ञ व्यक्तीला भेटून ती दाखवा. जर ह्या प्रश्नांची उत्तरे
समाधानकारक असतील तर तुम्ही खुशाल योगमार्गावर वाटचाल करण्यास सरसावू शकता.
(क्रमश:)
जर इच्छा असेल तर
आपण आमच्या
Mailing List चे सभासद होऊ शकता. त्यासाठी तुमचा
Email address आम्हाला
Contact Us Page द्वारे
पाठवा. जेंव्हा नविन लेख उपलब्ध होतील तेंव्हा तुम्हाला
Email द्वारे कळवण्यात येइल. कृपया आपल्या मित्रांना,
ओळखीच्यांना व या विषयाची आवड असणार्या इतर साधकांना या लेखमाले विषयी अवश्य
सांगा. कुंडलिनी योग यथार्थ स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या आमच्या छोटयाशा
प्रयत्नात मदत करणार्या प्रत्येकाचे आम्ही शतश: आभारी आहोत.
|
About the Author
|
|
Bipin Joshi |
|
You can read more about the author here. |
|