AddThis Feed Button
Bookmark and Share






Untitled 1

भाग 3 : गुरुचा शोध

मराठी माणसाला ज्ञानेश्वरीची निराळी ओळख सांगण्याची गरज नाही. मीही ज्ञानेश्वरी विषयी बरेच वाचले होते पण संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष अभ्यासण्याचा योग कधी आला नव्हता.  त्या दिवसानंतर प्रथमच मी ज्ञानेश्वरी अथ पासून इति पर्यंन्त वाचून काढली. सहाव्या अध्यायाने मला वेडावून टाकले.

नागिणीचे पिले । कुंकुमे नाहले । वळण घेऊनि आले । सेजे जैसे ॥
तैशी ती कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निदेली असे ॥

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर कुंडलिनी जागृतिचे अनुभव एकामागून एक उलगडत  होते. कुंडलिनी योग आत्मसात करण्याचा मनाचा निश्चय आपोआप दृढावत गेला. नंतर हठयोग प्रदिपीका, घेरंड संहिता, शिव संहिता, योग उपनिषदे इत्यादी ग्रंथांबरोबरच रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, परमहंस योगानंद, परमहंस सत्यानंद सरस्वती इत्यादींचे लेखन अभ्यासले. त्या वरून एक गोष्ट लक्षात आली की या मार्गावर गुरू पाहिजे. झाले. गुरूचा शोध सुरू झाला.

प्रथम ठाणे-मुंबई परिसरातील मान्यवर योग संस्थांची माहिती काढली. असे लक्षात आले की बहुतेक सर्वच संस्थांचे ध्येय 'आरोग्यासाठी योग' हे आहे. कुंडलिनी योग खात्रिशीरपणे कोणीच शिकवत नव्हते. त्या नंतर काही योगशिक्षकांना भेटलो. पण ते सगळे पुस्तकि पंडित निघाले. ते कुंडलिनी विषयी उत्साहाने बोलत पण मी जेंव्हा त्यांना उत्सुकतेपोटी विचारी कि 'तुम्ही कुंडलिनी जागृती अनुभवली आहे का?' तेंव्हा ते गडबडून जात. काही प्रामाणिक पणे 'नाही' असे उत्तर देत, काही हा मार्ग धोकादायक आहे असे सांगत तर काही या माझ्या प्रश्नावरच वैतागत (कधी कधी सत्य स्विकारणे किती अवघड असते!). कृपया लक्षात घ्या की या प्रश्नांमागील माझा प्रामाणिक हेतू योग्य गूरू मिळवणे हा होता. कोणाला कमी लेखणे हा हेतू कधीच नव्हता. असो.

शेवटी एक दिवस निर्णय घेतला की हे 'गुरू शोधन' बंद करायचे व स्वत:च काही निवडक साधना सूरु करायच्या. गुरू शिवाय हा मार्ग कठीण आहे ह्याची कल्पना होती पण 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' हे पटत नव्हते. योग्य गुरू मिळेपर्यंत तरी आपली आपण साधना करावी असा निश्चय केला. एका शुभ दिवशी पहाटे लवकर उठलो. स्नान करून इष्ट देवतेची व ज्ञानेश्वरीची पूजा केली. त्यानंतर ज्ञानेश्वरीला गुरू ग्रंथ मानून कुंडलिनी योग साधनेची शपथ घेतली.

ज्ञानेश्वरी व शिव संहितेतील साधनांनी मला जास्त आकर्षित केले होते व त्यांतील काही निवडक प्राणायाम, मुद्रा व धारणा मी करू लागलो. सुरवातीस थोडे जड गेले पण काही काळानंतर सर्व सुरळीत सूरु झाले. नोकरी करत असल्याने योग ग्रंथात सांगितल्या प्रमाणे दिवसातून चार वेळा प्राणायाम जमत नसे. तरी दिवसातून तीन वेळा मी प्राणसाधना करू लागलो. त्यातील एक वेळ मध्यरात्री बारा नंतरची असे. रात्रीच्या नि:शब्द गूढ अंधारात शिव संहितेतील मंत्र आठवत आठवत साधना करण्यात काही औरच मजा वाटे. या मध्यरात्रीच्या साधनेमूळे दिवसा खूप झोप येत असे पण कालांतराने त्याची सवय झाली. काही महिन्यांच्या नियमीत सरावानंतर काही छोटे छोटे अनुभव येऊ लागले. माझी 'स्वयं दिक्षा' कार्य करत आहे हे पाहून मनाला समाधान तर वाटलेच पण आपण योग्य मार्गाने जात आहोत याची खात्री पटत गेली. त्यावेळी मला माहीत नव्हते की काही वर्षांनी मला एक आगळीवेगळी दिक्षा मिळणार आहे.          

महत्वाच्या टिपा:

  • मी स्वत: प्रत्यक्ष गुरु शिवाय साधना केली याचा अर्थ मी हाच मार्ग सर्वांना सुचवत आहे असे मानण्याचे अजिबात कारण नाही. य़ोग्य गूरू भेटल्यास अवश्य त्याच्या चरणांशी बसून साधना मार्गावर आरूढ व्हावे.
  • नवीन साधकांना सांगावेसे वाटते ही त्यांनी प्राणायाम अतिशय काळजीपूर्वक करावा. सुरवातीला दिवसातून फक्त एकदाच मोजक्या प्रमाणात प्राण साधना करावी. कुंभक आणि आवर्तने अतिशय सावकाश वाढवावीत. अति प्राणायामाने कुंडलिनी फार लवकर जागृत होऊ शकते व बराचदा अशी जागृत झालेली शक्ती हाताळण्यास कठीण जाते.

~~~~~

'खरा गुरू कसा ओळखावा?' हा प्रश्न बर्‍याच नवीन साधकांना पडतो. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण त्यावर तुमचे सगळे आध्यात्मिक जीवन अवलंबून असते. केवळ तात्विक चर्चेत रस असणारे असा प्रश्न उपस्थित करतील के ज्या व्यक्तीने अजून आध्यात्मिक जीवनाला सुरवातही केलेली नाही अशा व्यक्तीला गूरूची योग्यायोग्यता ठरवण्याचा मुळात अधिकार आहे का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी एक व्यावहारीक उदाहरण घेऊ या. समजा तुम्ही दहावी पास झाला आहात व पुढच्या शिक्षणासाठी कला, वाणिज्य व विज्ञान यांपैकी कोणती शाखा निवडायची ते तुम्हाला ठरवायचे आहे. तुम्हाला या तीन शाखांबद्दल काहीच माहिती नाही. अशा वेळी तुम्ही काय कराल? तुम्ही घरातल्या वडीलधार्‍यांना विचाराल, जाणकार मित्रांना विचाराल, व्रुत्त्तपत्रातील या विषयीचे लेख वाचाल किंवा एखाद्या अनुभवी Career Counselor ची मदत घ्याल. त्या नंतर तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकाल.  याचाच अर्थ असा की या तीन शाखांविषयी काहीही माहिती नसतांना देखील तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता. अगदी हाच मार्ग अवलंबून तुम्ही चांगला गूरू शोधू शकता. आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका. दिखाऊपणावर भाळून जाऊ नका. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. आध्यात्ममार्गावर स्वामी विवेकानंदांसारखी विचारी वृत्ति अंगी बाणवण्याचा प्रयत्न करा.

शास्त्रग्रंथ व संत वांग्मय यांमधे खर्‍या गूरूची बरीच लक्षणे सांगितली आहेत. जिज्ञासू साधकांनी ती जरूर पहावीत. प्रस्तूत लेखामध्ये आजच्या काळात आवश्यक अशी काही लक्षणे देत आहे. ज्याच्याकडे तुम्ही गूरु म्हणून पाहणार आहात त्याच्यामधे ही लक्षणे आढळल्यास सावध रहावे. अन्यथा मागाहून पश्चात्ताप करण्याची पाळी येईल!

गूरुचे महत्व सर्वमान्य आहे. त्यात दुमत असण्याचे कारण नाही परंतू जर गूरू त्याचा गूरूपणा शिष्याच्या मनावर अकारण वारंवार ठसवू पहात असेल तर मात्र त्याच्या हेतू विषयी शंका घेण्यास जागा आहे. अशा गूरूंभोवती  साधारणत: जवळच्या शिष्यांचे एक कोंडाळे असते. ते कोंडाळे नव्या शिष्यांचे पद्धतशिरपणे Brain Washing करते. शेवटी शिष्य गूरूच्या एव्हढा आहारी जातो की तो स्वत:ची विचारशक्तीच गमावून बसतो.     

माझा एक मित्र होता. मूळात त्याचे वडील डॉक्टर त्यातच तो स्वत: बरीच वर्ष अमेरीकेत राहीलेला. त्यामूळे तो जरा जास्तच विचारी व चौकस होता. एकदा कोणत्याशा गुरूच्या भाषणाला गेला. गुरू स्वत:ला 'महाराज' म्हणवत होता. भाषणात महाराज गीतेतील, उपनिषदांतील व अन्य शास्त्रग्रंथातील जड व क्लिष्ट श्लोकांचा भडीमार करत होते. करता करता शेवती माझा मित्र कंटाळला. उठून म्हणाला - "महाराज! ग्रंथ काय सांगतात ह्या पेक्षा तुम्ही काय म्हणता ते कृपया सांगाल काय? शास्त्रग्रंथ जे सांगतात ते तुम्ही अनुभवले आहे काय?" या प्रश्नांबरोबर महाराज खवळले व थेट आजकालच्या शिष्यांच्या पात्रातेवर घसरले! सांगण्याचा मुद्दा हा की गुरु हा स्वत: अनुभुती असलेला हवा. पुस्तकी पांडित्य वादविवादासाठी उपयोगी पडते आत्मसाक्षात्कारासाठी नाही. बोलाचीच कढी बोलाचाच भात काय कामाचा?

खोट्या गूरूचे अजून एक लक्षण असे की तो शिष्याला आपल्यावर आंधळा विश्वास ठेवायला सांगतो. शिष्याने कोणतेही प्रश्न न विचारता सांगितलेली गोष्ट निमूटपणे केली पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते. जो गूरू शिष्याला स्वत:चा असा विचार करायला उद्युक्त करत नाही तो नि:शंय फसवा समजावा. प्रत्येक शिष्याला आध्यात्मिक प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि गूरूने तो नाकारता कामा नये. प्राचीन काळी हे तत्व कसोशीने पाळले जात असे. कित्येक उपनिषदे ही शिष्यांच्या शंकांचे निरसन अशा स्वरूपात आहेत. श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रश्न विचारण्याची मुभा दिली नसती तर गीतेचा सुगंध दरवळलाच नसता. श्रीकंठाने गिरीजेला ही मुभा दिली नसती तर कित्येक आगम ग्रंथ अस्तित्वातच आले नसते.        

'चमत्कारा शिवाय नमस्कार नाही' असे म्हटले जाते. याचाच आधर घेऊन खोटे गूरु अनेक चमत्कार दाखवतो. अंगारा काढणे ते रोग बरा करणे अशा अनेक भूलथापांनी तो शिष्यांना फसवतो. शिष्यपरिवार वाढवणे हे ही त्यामागचे एक उद्दीष्ट असते. खर्‍या गूरूला अशा चमत्कारांची कधीच गरज भासत नाही. महाराष्ट्रातील संत परंपरेने अशा चमत्कारांना कधीच महत्व दिलेले नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे.

आत्मसाक्षात्काराचे अनेक मार्ग आहेत. दुर्दैवाने या विविध विचार प्रवाहांमधे कधीच समन्वय नसतो. प्रत्येक गूरू व त्याचे शिष्य आपला मार्ग तो खरा दुसर्‍याचा तो खोटा असा प्रचार करताना दिसतात. आज विविध संप्रदायांमधे वाद-विवाद असण्याचे मूख्य कारण ही असहिष्णूता आहे. रामकृष्ण परमहंसांचे 'गोस्पेल' कधी वाचलेय? त्यांच्या कडे अनेक प्रकारची माणसे येत. ते स्वत: जरी सगूण भक्तीचे पुरस्कर्ते असले तरी निर्गूण भक्तीमार्ग अवलंबणार्‍यांना ते कधी नावे ठेवत नसत. खरा गुरु हा उदार मनाचा असतो. सर्व जातीधर्मांच्या व विचारांच्या शिष्यांना बरोबर घेऊन पूढे जाण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी असते.

वर दिलेले मुद्दे हे केवळ वानगी दाखल दिलेले आहेत. अजून अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. सारांश हा की कोणालाही आंधळेपणाने गूरू म्हणून स्विकारू नका. तो कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे पहा. त्याला प्रत्यक्ष भेटा, मनातील प्रश्न विचारा व मगच निर्णय घ्या. हे करत असतांना आपली शिष्यपणाची मर्यादा मात्र सोडू नका. कोणाला उर्मट प्रश्न करून डिवचणे हे उद्दिष्ट असता कामा नये. खरा गुरू शोधणे हेच उद्दिष्ट असले पाहिजे. 

काही वर्षांपूर्वी एका वाचकाची Email आली होती. त्याचे म्हणणे होते की त्याला परमेश्वर प्राप्तीची नितांत ओढ आहे. पण योग्य गुरू नसल्याने तो चाळीस वर्षे पूढे जाऊ शकला नव्हता. मी जेंव्हा त्याला विचारले की त्याची सद्ध्याची साधना काय आहे तर त्याचे उत्तर होते - "काहीच नाही." त्याची परमेश्वर प्राप्तीची ओढ खरोखरच तीव्र होती असे म्हणता येईल का? अर्थातच नाही. हाच प्रकार अनेकांचा असतो. त्यांचा आपली ओढ प्रामाणिक आणि अतिशय तीव्र आहे असा समज असतो. अशा भ्रमात कृपया राहू नका. जर काही कारणाने तुम्हाला गुरू मिळाला नाही तर स्वस्थ बसू नका. कमीत कमी देवाचे नामस्म्ररण वा जप तरी तुम्ही करू शकता. त्यातील कर्मकांडाला व क्लिष्ट तांत्रिक बाबींना फाटा देऊन भक्ति वाढवण्याचा प्रयत्न करू शकता.

तुम्हाला एकदा गुरू मिळाला (प्रत्यक्ष किंवा ग्रंथादि रुपाने) की अत्यंत प्रामाणिकपणे त्याच्या आशिर्वादाने साधनेला सुरवात करा. गूरू व त्याच्या शिकवणी विषयी "आतां ह्रदय हे आपुले । चौफाळूनियां भले । वरी बैसऊं पाउले श्रीगुरूंची॥" अशी उत्कट भक्ती ठेवा आणि मग पहा योगमार्ग कसा सहजसाध्य होतो ते.

(क्रमश:)

जर इच्छा असेल तर आपण आमच्या Mailing List चे सभासद होऊ शकता. त्यासाठी तुमचा Email address आम्हाला Contact Us Page द्वारे पाठवा. जेंव्हा नविन लेख उपलब्ध होतील तेंव्हा तुम्हाला Email द्वारे कळवण्यात येइल. कृपया आपल्या मित्रांना, ओळखीच्यांना व या विषयाची आवड असणार्‍या इतर साधकांना या लेखमाले विषयी अवश्य सांगा. कुंडलिनी योग यथार्थ स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या आमच्या छोटयाशा प्रयत्नात मदत करणार्‍या प्रत्येकाचे आम्ही शतश: आभारी आहोत.




Posted On : 25 Jul 2008
Current Rating :
Rate This Article :

About the Author
Bipin Joshi
You can read more about the author here.


Copyright (C) Bipin Joshi. All rights reserved.
Contact Us
Read Terms Of Use