Untitled 1
भाग 7 : अद्भुत स्वप्न आणि दीक्षा
एका विशाल पर्वताचा चढ मी चढत होतो. सर्वत्र एक विलक्षण शुभ्र व चांदणे
पडल्यासारखा आल्हाददायक प्रकाश पडला होता. जाता जाता योगी, साधू, संन्यासी, बैरागी
व तांत्रीकांचे जथेच्या जथे मला दिसत होते. कोणी चित्रविचित्र आसने करत होते तर
कोणी तंत्र-मंत्रात गर्क होते. कोणी उग्र तपाचरणात मग्न होते तर कोणी भव्य यज्ञ
उभारत होते. ते कोण आहेत काहीच कळत नव्हते. प्रत्येकजण आपापल्या कार्यात व्यर्ग
होते. कोणालाही माझ्याकडे लक्ष देण्यास सवड नव्हती. करता करता चढ संपला. एक अद्भुत
दृश्य समोर दिसत होते. श्रीशंकर गिरीजेसह विराजमान झाले होते. मघाचा तो प्रकाश त्या
उभयतांच्या मुखमंडलामधूनच प्रकट होत होता. मला आनंदाचे भरते आले. मी त्यांना
वारंवार नमस्कार करू लागलो. तोंडाने स्तुतीपर वचने बोलू लागलो. काही काळाने आनंदाचा
भर ओसरल्यावर काय करावे हे न सुचून त्यांच्या पायाशी तसाच स्वस्थ बसून राहीलो.
देवीने मला एखाद्या लहान मुलासारखे जवळ घेतले व डोक्यावरून ममतेने हात फिरवला.
मला एकदम रडूच कोसळले. मी हमसाहमशी रडू लागलो. बर्याच दिवसांनी एखाद्या लहान
मुलाला आई-वडील भेटले तर तो कसा रडतो तसा मी रडत होतो. "काय झाले शिवालय?" माझा
चेहरा वर उचलत देवीने प्रेमाने विचारले. मी चमकलो. कोण शिवालय? मी? मला ओरडून
सांगावेसे वाटले की मी शिवालय का कोण नाही. माझ्या चेहर्यावरील गोंधळ देवांनी
पाहीला की काय कोण जाणे. "त्याला त्याचे नवे नाव कुठे माहीत आहे अजून" ते उद्गारले.
मला ती दोघं काय बोलतायत ते अजिबात कळत नव्हते. देवांनी मला जवळ घेतले,
माझे डोळे पुसले व विचारले -
"काय झाल रडायला?" रडतरडतच मी उत्तरलो "येताना मी अनेक योगी-तपस्वी पाहीले. ते फार
विचित्र व कठीण साधना करत होते. मला असे काहीसुधा येत नाही. माझी
तुमच्याप्रत पोहोचण्याची सारी स्वप्ने आज पार धुळीस मिळाली." त्यांचा चेहरा
थोडा गंभीर झाला. माझ्या डोळ्यात पहात ते म्हणले - "तू ही असले उपद्व्याप खुप
केलेस. आता त्याची गरज नाही. मी जीवाला अन्न, पाणी, प्रकाश दिला तसेच मुक्तीचा
मार्गही दिलाय. पण त्या सोप्या मार्गाने जाण्यापेक्षा तुम्ही माणसं फार क्लिष्ट
मार्गाने जाता." क्षणभर थांबून त्यांनी विचारले - "तुला माझ्याप्रत पोहोचायचय ना?"
माझा होकार जणू गृहीत धरून त्यांनी मला खांद्याला धरून खाली बसवले. आपले दोन्ही हात
माझ्या डोक्यावर ठेवले. मी क्षणार्धात निश्चल झालो. माझ्या मनातले सगळे विचार
नाहीसे झाले. खाली झुकून त्यांनी माझ्या कानात एक
मंत्र पुटपुटला. माझे सारे शरिर रोमांचित झाले. गात्रागात्रांमधून एक विलक्षण
प्रवाह धावू लागला. त्याच वेळीस त्यांचे हात डोक्यावर किंचितसे दाबले गेले. मगा
मंदिरात जसा विजेचा प्रवाह वाहीला होता तसाच माझ्या पाठीतून वाहू लागला. पण हा बराच
सुखकारक होता. सर्व शरिरातून प्रकाशाचे बारीक बारीक कण प्रचंड वेगाने डोक़्याकडे (की
त्यांच्या हाताकडे?) धावू लागले. जाता जाता ते प्रकाशकण जागोजागी क्षणभर थांबत
होते. त्या प्रकाशकणांनी सारे शरिर जणू घुसळून निघत होते. डोक्यात हजारो सुगंधी
फुलांच्या पाकळ्या कुस्करल्यावर जसे वाटेल तसे वाटत होते. मंद मंद काहीतरी घुसळले,
कुस्करले जात होते. असे वाटत होते की जन्मोजन्मीची पुटे नाहीशी होत आहेत. मला जणू
नशा चढली होती. नशा परमेश्वराच्या नावाची. श्वासाबरोबर मंत्र आपोआप उमटत होता.
कालांतराने श्वास थांबला. फक्त मंत्रच उमटू लागला. काही वेळाने तोही थांबला. प्रगाढ
शांततेने मन ओतप्रोत भरून गेले. त्या अवस्थेत मी किती वेळ होतो मला माहीत
नाही. केव्हातरी देवांचे धीरगंभीर शब्द कानावर पडले - "आज तुझा नवा जन्म झालाय.
तुझे नवे नाव योगी शिवालय. या शरिरातच सारी
ज्योतीर्लिंगे आणि तिर्थक्षेत्रे आहेत. मी देवळांमधे नाही या देहातच आहे. स्वत:शी
प्रामाणीक रहा. मग कोठलेच यम-नियम पाळावे लागणार नाहीत. जगात परत जा पण कमलपत्रावरच्या
पाण्यासारखा अलिप्तपणे जग. आता दिलेली साधना सोडू नको. तसा ती सोडूही शकणार नाहीस."
मग सारे त्या प्रकाशात गुडूप होऊ लागले. तो पर्वत, ते
योगी, देव, देवी. सगळेच विरघळू लागले. मी जीवाच्या आकांताने ओरडायचा प्रयत्न केला
की "मला सोडून जाऊ नका."
त्या आक्रोशाबरोबर मला जाग आली. आजूबाजूला मिट्ट काळोख होता. मला धक्का बसला.
त्याल दोन कारणे होती. एक म्हणजे माझ्या डोक्यात अजुनही मंद मंद पाकळ्या कुस्करल्या
जात होत्या व दुसरे म्हणजे मी पद्मासनात बसलो होतो. मला पक्के आठवत होते की मी
झोपतांना बिछान्यावर स्वत:ला झोकून दिले होते. मग मी बसलो कसा? तेही पद्मासनात? आता
अनुभवले ते काय होते? स्वप्न की सत्य? डोके काम करेना. सकाळपासून घडणार्या घटनांचा
संदर्भ लावण्याचा प्रयत्न मन आपसूक करू लागले. मंदिरातला प्रसंग आठवला व वेळेची
आठवण झाली. घड्याळाकडे नजर टाकली. छातीत धस्स झाले. घड्याळाचा इंडीग्लो रात्रीचे
साडे दहा दाखवत होता. मी मंदिरामधून आलो तेव्हा फारच फार सकाळचे सात-साडेसात झाले
असतील. मी एव्हढा वेळ झोपलो? सकाळी मी काहीच खाल्ले नव्हते. तहान, भुक, आवाज या कशानेच
मला जाग येऊ नये? ही नैसर्गीक झोप होती की अजुन काही? डोके भंडावून गेले होते.
झाल्या प्रकाराचा विचार करणे सोडून अंधारात तसाच बसलो. काही काळाने जाणीव
झाली की प्रचंड तहान लागलेय. पाण्याची बाटली कुठे ठेवली आहे तेच आठवत नव्हते. तसाच
धडपडत उठलो. वॉशबेसीन गाठले आणि आजवर शिकलेले स्वच्छतेचे सगळे नियम बाजूला सारून नळाला
तोंड लावले.
~~~~~~
"श्रीशंकराचा नियमच आहे की दीक्षे शिवाय मोक्ष नाही आणि दीक्षा
गुरू शिवाय मिळत नाही. गुरू शिवाय सर्व तत्वज्ञान, पारंपारीक ज्ञान, मंत्र फुकट
जाते."
~ कुलार्णव तंत्र
तंत्रग्रंथ व योगग्रंथ दीक्षेची व गुरूची एवढी महती का बर गात असतील? एक
व्यावहारीक उदाहरण देतो. समजा तुम्हाला तबला शिकायची इच्छा आहे. तुम्ही केवळ
पुस्तके वाचून तो शिकू शकाल? अर्थातच नाही. अगदी हीच गोष्ट योगसाधनेच्या बाबतीत खरी
आहे. योग हे एक शास्त्र तर आहेच पण ती एक कलाही आहे. आज आपल्याकडे ज्ञान मिळवण्याचे
कितीतरी मार्ग उपलब्ध आहेत. पुस्तके, CD, DVD, Internet,
TV, रेडीओ, वर्तमानपत्रे इत्यादी. कल्पना करा आज ही सगळी
साधने आपल्याला उपलब्ध असूनही आपल्याला गुरूची गरज जाणवते मग हजारो
वर्षांपूर्वी जेव्हा ह्यापैकी कोणतेही साधन उपलब्ध नव्हते तेव्हा गुरूचे महत्व किती
असेल? दुर्दैवाने आज गुरूची किंमत कमी झालेली दिसते. गुरू-शिष्याचे नाते
आज बरेच ठिकाणी बोथट झालेले आढळते. क़ेवळ गुरूपौर्णिमा वा शिक्षक दिनाच्या दिवशी
गुरूबद्दल आदर दाखविल्यासारखे करून गुरूचे गोडवे गायले जातात. अर्थातच यालाही काही
अपवाद आहेतच. आज दिखाऊ गुरूप्रेमापेक्षा गरज आहे ती गुरूच्या शिकवणीचा आदराने अवलंब
करण्याची. जर शिष्य आपली शिकवण अवलंबीत नसेल व केवळ दिखावू भक्ती दाखवत
असेल तर कोणत्याही खर्या गुरूला वाईटच वाटेल.
योगमार्गावर गुरू शिष्याला वाटचाल करायला शिकवतो ते दीक्षेच्या माध्यमातून.
प्राचीन काळी दीक्षा सर्वच शिष्य होऊ इच्छिणार्यांना मिळत नसे. कुलार्णव
तंत्र म्हणते की दीक्षा देण्यापूर्वी गुरूने शिष्याची एक वर्ष कडकपणे परीक्षा
करावी. त्याच प्रमाणे शिष्यानेही गुरूच्या ज्ञानदानाच्या क्षमतेबद्दल डोळे उघडे
ठेऊन पहाणी करावी व खात्री पटल्यावरच त्याला शरण जावे. हा सल्ला किती
महत्वाचा आहे! विशेषत: कलियुगात तर तो जास्तच मोलाचा आहे. दुर्दैवाने आज काय झालय
की बर्याच गुरूंना शिष्य मिळवण्याची हाव सुटलेय. मग शिष्य कसेही असोत. आजच्या
शिष्यांनाही 'तू दीक्षेला अपात्र आहेस' असे सांगितले तर राग येतो. आपल्याला
पात्र बनवण्यापेक्षा ते गुरूलाच नावे ठेवतात. कलियुगाची महती. दुसरे काय!
दीक्षा हा मुळ संस्कृत शब्द दीक्ष पासून बनला आहे ज्याचा अर्थ आहे '-ला वाहून
घेणे'. दीक्षा या शब्दाचा दुसरा अर्थ 'बघणे' असाही आहे. या वरून असे म्हणता येईल की
योगदीक्षा म्हणजे स्वत:ला योग मार्गाला वाहून घेऊन आत्म्याला प्रत्यक्ष
बघणे अर्थात आत्मसाक्षात्कार घडवून आणणे. दीक्षा हा शिष्याचा जणू
पुनर्जन्मच असतो. म्हणुनच दीक्षेनंतर शिष्याला नवे नाव, नवा पारंपारीक वेष दिला जातो.
अर्थातच नवे नाव वा वेष हे केवळ बाह्य लक्षण आहे. वर सांगितल्या
प्रमाणे अशी दीक्षा गुरूकडूनच मिळू शकते. काळानुरूप गुरूचे स्वरूप बदलू
शकते एवढेच.
दीक्षे बद्दल एवढे विस्ताराने लिहीण्याचे कारण असे की आज दीक्षेचा अर्थ बराच
बदलला आहे. माझ्या या वेब साईटच्या निमीत्ताने माझा जगभरातल्या साधकांशी संपर्क
येतो. त्यांमधे दीक्षेच्या नावाखाली फसवले गेलेले साधकही असतात. त्यांनी कथन
केलेल्या अशाच काही
फसव्या दीक्षांची उदाहरणे खाली देत आहे. कोणत्याही व्यक्तीवर वा संस्थेवर टीका करणे हा
हेतू अजिबात नसल्यामुळे कोणाचाही नामोल्लेख न करता ती देत आहे. ही उदाहरणे या
मार्गावर नवीन असलेल्या साधकांसाठी सावध राहण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील.
माझे कुंडलिनी योग या विषया वरचे पुस्तक प्रकाशीत झाल्यानंतर काही वृत्तपत्रांत
त्या विषयी बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या निमीत्त्याने एका योगजिज्ञासू
वार्ताहाराशी संपर्क आला. एका तथाकथीत गुरूने त्याला शक्तीपात देतो असे सांगून
बोलावले. तो गेल्यावर त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला सांगितले की मी आता
तुझ्यामधे शक्ती टाकली आहे. सहस्रारावर ध्यान करण्यासही सांगितले. विचार करा.
ज्याला योगमार्गाची नीटशी ओळखही नाही त्याला सोपे ध्यानमार्ग सोडून एकदम
सहस्रारावर ध्यान करण्याचा सल्ला देण्यात आला. पंडित गोपीकृष्णांनी थेट
सहस्रारावर ध्यान करून काय अनुभवले ते तुमच्यापैकी काहींनी वाचले असेल.
त्या गुरूचा शक्ती विषयीचा दावाही पार खोटा निघाला. त्या वार्ताहाराला एवढ्या
वर्षात कुंडलिनी जागृतीचा कसलाही अनुभव आला नव्हता.
दुसरा अनुभव संन्यास दीक्षेचा. एक साधक योग-वेदांताचा प्रसार करणार्या एका
मान्यवर संस्थेमधे संन्यासी म्हणून दाखल झाला. काही कालाने आपली पार फसवणूक झाली
आहे ते त्याला लक्षात आले. त्याची अपेक्षा होती की संन्यासी झाल्यावर त्याला
साधनेसाठी भरपूर वेळ मिळेल. पण संस्थेमधे त्याला कामा शिवाय काहीच देण्यात येत नसे.
शेवटी हे असह्य होवून त्याने संस्था सोडण्याचा निर्णय घेतला. ती संस्था काही त्याला
सोडेना. त्याला जणू नजर कैदेत ठेवण्यात आले. एक दिवस सर्वांचे
लक्ष चुकवून त्याने घरच्यांना पत्र लिहीले व त्या नंतर घरच्यांनी त्याची सुटका
केली.
तीसरी कथा दोघा मित्रांची. दोघांनाही क्रियायोगात खूप रस. दोघांनी एका संस्थेचे
सभासदत्व स्विकारले व त्यांचा कोणतासा कोर्स पूर्ण केला. कोर्स पूर्ण केल्यावर
दीक्षा मिळेल असे सांगण्यात आले. दोघेही आनंदात होते. दीक्षेच्या दिवशी त्यांना एक
प्रतिज्ञापत्र की शपथपत्र देण्यात आले यांवर त्यांना सही करायची होती. त्या पत्रात
गोपनीयतेची शपथ होती. येथपर्यंत सगळे ठीक होते. पण ती शपथ मोडल्यास
नैसर्गिक आपत्ती कोसळतील व अशा साधकाचा नाश होईल अशी गर्भित धमकीही होती.
ते वाचून त्यापैकी एकाने पाऊल मागे घेतले. दुसर्य़ाने सही केली. दीक्षेचा विधी
म्हणून त्याला गुरूचे पूजन वगैरे करण्यास सांगण्यात आले. नंतर काही साधना शिकवण्यात
आल्या. त्या दीवसा नंतर मात्र गुरूशी त्याचा कोणताच संबंध नव्हता. काही
प्रश्न वा शंका असतील तर संस्थेतील दुसरेच कोणी त्या ऐकत असे. बहुतांशी वेळा त्याचे
प्रश्न अनुत्तरीतच रहात. कालांतराने योग्य मार्गदर्शनाअभावी त्याने तो
मार्गच बंद केला.
शेवटचे उदाहरण एका भारतातून 'निर्यात' झालेल्या गुरूचे. एका साधकाला त्याने
शक्तीपात दिला. तो खराच शक्तीपात होता. त्या नंतर साधकाला क्रिया सुरू झाल्या. त्या
एव्हढ्या प्रबळ होत्या की तो साधक पार घाबरून गेला. गुरूशी संपर्क साधण्याचा त्याने
बराच प्रयत्न केला. पण त्या गुरूभोवती असणार्या कोंडाळ्याने त्याला काही दाद दिली
नाही. शक्ती स्वत:ची काळजी घेईल असे त्यांचे ठरलेले उत्तर असे. शेवटी
Google search करता करता त्याला माझ्या वेब साईट विषयी
कळले व त्याने मला Discussion Forum द्वारे संपर्क
साधला. एव्हढ्या दुरून त्याला अचूक मदत करणे अर्थातच कठीण होते. तरीही त्याची
लक्षणे नीट जाणून घेऊन त्याला काही उपाय सुचवले ज्यांनी फायदा झाल्याचे त्याने
कळवले. गुरूचे काम केवळ अशी कुंडलिनी जागृत करून संपत नाही. शिष्याला लागेल
तेव्हा आध्यात्मिक मार्गदर्शन करणे हे ही त्याचे कर्तव्य आहे. या अनुभवा नंतर तो साधक
एवढा घाबरला होता की या मार्गाविषयी कायमची अढी त्याच्या मनात घर करून बसली होती.
वरील दीक्षा का फसल्या? केवळ गुरूला दोष देऊन चालणार नाही. शिष्यही तेवढेच दोषी
आहेत. कमी कष्टात आध्यात्मिक प्रगती साधण्याच्या हव्यासापायी शिष्य
'शॉर्टकट' शोधतात व अनेकदा फसतात. माझ्याकडे योग शिकायला येणार्या
प्रत्येकाला मी सांगतो की -
आध्यात्मिक प्रगती = स्वत:चे अथक प्रयत्न + पुर्वकर्म +
गुरूची कृपा
वरीलपैकी एक जरी घटक कमी असेल तरी आध्यात्मिक प्रगती अशक्य आहे. हे सर्व अनुभव वाचून घाबरून जाण्याचे कारण नाही. साधकाने गुरू व मार्ग शोधताना
सावध राहणे का आवश्यक आहे ते नीट कळावे म्हणून मी ते सांगितले. जर योग्य ती खबरदारी
घेतली तर अशी फसवणूक टाळणे साधकांना शक्य आहे. योग्य गुरू व त्याच्याकडून
मिळालेली दीक्षा तुमचे कल्याणच करेल यात शंकाच नाही.
(क्रमश:)
जर इच्छा असेल तर
आपण आमच्या
Mailing List चे सभासद होऊ शकता. त्यासाठी तुमचा
Email address आम्हाला
Contact Us Page द्वारे
पाठवा. जेंव्हा नविन लेख उपलब्ध होतील तेंव्हा तुम्हाला
Email द्वारे कळवण्यात येइल. कृपया आपल्या मित्रांना,
ओळखीच्यांना व या विषयाची आवड असणार्या इतर साधकांना या लेखमाले विषयी अवश्य
सांगा. कुंडलिनी योग यथार्थ स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या आमच्या छोटयाशा
प्रयत्नात मदत करणार्या प्रत्येकाचे आम्ही शतश: आभारी आहोत.
|
About the Author
|
|
Bipin Joshi |
|
You can read more about the author here. |
|